मुंबई - सोन्या-चांदीच्या वायदा बाजारातील किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. गेल्या 2 महिन्यांत रुपयाचा भाव वधारला असून सद्यस्थितीत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 73 ते 74 च्या रेंजमध्ये आहे. कोरोना संकटाच्या सुरुवातील डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 78 पर्यंत गेला होता. मात्र, गेल्या महिनाभरात रुपयाचा भाव वधारल्याने सोन्याची किंमतीतही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा वायदा बाजारातील भाव 0.9 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे, सोन्याची किंमत 50,130 रुपये प्रतितोळा एवढी पोहोचली आहे.
सोन्याच्या दरात सातत्याने घट होत असली तरी, सोन्याची किंमत पहिल्याप्रमाणे कमी होणार नाही. सद्यस्थितीत सोन्याचा प्रति तोळा भाव 50.000 रुपये आहे. तर, चांदीचा भाव 60 हजार रुपये प्रती किलो एवढा आहे. येणाऱ्या काळातही या भावात कमी-जास्त किंमती पाहायला मिळणार आहेत. दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण किंवा वाढ पाहायला मिळणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दिवाळीतही सोन्याचा भाव 50 ते 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम असेल, असा बाजारातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. चांदीच्या वायदा बाजारातही 0.88 टक्क्यांनी घट झाली असून चांदीचे दर प्रति किलो 60,605 एवढे झाले आहेत. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति किलोपर्यंत वधारला होता. तर, चांदीनेही 80 हजार प्रति किलोपर्यंत मजल मारली होती.
जागतिक बाजारात सोन्याचे दर
जागतिक पातळीवर सोन्याचे वायदे आणि स्पॉट दोन्ही किंमतीत घसरण झाली. ब्लूमबर्गच्या मते, बुधवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदा बाजारातील दर 0.36 टक्क्यांनी म्हणजे 6.90 डॉलरने घसरून 1,896.30 डॉलर प्रति औंस झाले. याशिवाय, सोन्याचा जागतिक स्पॉट किंमतीत सध्या 0.40 टक्के म्हणजेच 6.90 डॉलरची घट होऊन प्रति 1,896.30 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसून आला.
जागतिक बाजारात चांदीचे दर
ब्लूमबर्गच्या मते, बुधवारी सकाळी, कॉमेक्सवरील चांदीचा जागतिक वायदा भाव 1.90 टक्क्यांनी म्हणजेच 0.46 डॉलर खाली घसरून 23.98 डॉलर प्रति औंस झाला. त्याचबरोबर, चांदीच्या जागतिक स्पॉट बाजारातील किंमत 23.91 डॉलर प्रति औंस ट्रेंड होत आहे.