नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर स्टॉकिस्टांनी विक्री केल्याने गुरुवारी राजधानी दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव १०० रुपयांनी कमी होऊन २८,४०० रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा झाला. तथापि, चांदीचा भाव मात्र, नव्याने झालेल्या मागणीने १०० रुपयांनी उंचावून ४४,९०० रुपये प्रतिकिलो राहिला.बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारात कमजोर कल होता. याचा परिणाम देशी बाजार धारणेवर होऊन सोन्याचा भाव घसरला. लंडन बाजारात सोन्याचा भाव ०.४ टक्क्याने घटून १,३२२.१३ डॉलर प्रतिऔंस झाला.तयार चांदीच्या भावात मात्र, १०० रुपयांची सुधारणा होऊन तो ४४,९०० रुपये प्रतिकिलो आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ४४,३२० रुपये प्रतिकिलोवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याचा भाव घसरला; चांदी वधारली
By admin | Published: July 04, 2014 5:57 AM