नवी दिल्ली : लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने तसेच भारतीय रुपयात होत असलेल्या घसरणीमुळे सोन्याच्या भावात आठ दिवसांत तब्बल १,२५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बुधवारी सोने ४१ हजार ७५० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. चांदीचा भावही सहा दिवसांत दीड हजार रुपयांनी वाढून ती ४७ हजार ५०० रुपये प्रती किलोवर पोहचली आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या भावात वाढ होत असून ती अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून आतापर्यंत दोन हजार २५० रुपयांनी सोन्याच्या भावात वाढ झाली. यातील एक हजार २५० रुपयांची वाढ आठ दिवसांतील आहे. सोन्याच्या भावात १२ फेब्रुवारी रोजी ४०० रुपयांनी वाढ होऊन ते ४० हजार ९०० रुपयांवर पोहचले. पुढे १३ रोजी ते ४१ हजार रुपये व १७ रोजी ४१ हजार ३०० रुपयांवर पोहचले. त्यानंतरही मंगळवारी रोजी १०० रुपयांनी भाववाढ होऊन सोने ४१ हजार ४०० रुपये आणि आज ३५० रुपयांनी वाढ होऊन सोने ४१ हजार ७५० रुपयांवर पोहचले. गेल्या दोन दिवसांत ते तोळ्यामागे ४५0 रुपयांनी महागले आहे. चांदीच्या भावातही सहा दिवसात दीड हजार रुपये प्रती किलोने वाढ झाली आहे.