Join us

सोन्याचा भाव घसरला, चांदी मजबूत

By admin | Published: July 10, 2015 11:23 PM

शुक्रवारी भारतीय सराफा बाजारांत संमिश्र कल पाहावयास मिळाला. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव ४0 रुपयांनी उतरून २६,३३0 रुपये तोळा झाला. चांदी मात्र १0 रुपयांनी वाढून ३५,५१0 रुपये किलो झाली.

नवी दिल्ली : शुक्रवारी भारतीय सराफा बाजारांत संमिश्र कल पाहावयास मिळाला. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव ४0 रुपयांनी उतरून २६,३३0 रुपये तोळा झाला. चांदी मात्र १0 रुपयांनी वाढून ३५,५१0 रुपये किलो झाली. जागतिक बाजारात मजबुतीचा कल असतानाही दिल्लीत सोने उतरले. व्यापाऱ्यांनी सांगितले की, दागिने निर्मात्यांनी खरेदी कमी केली, तसेच किरकोळ विक्रेत्यांनीही बाजाराकडे पाठ फिरविली. त्यामुळे सोने उतरले. जागतिक बाजारात तेजी असल्यामुळे सोन्याच्या घसरणीला ब्रेक लागला; अन्यथा आणखी मोठी घसरण झाली असती.भारतातील सोन्याच्या भावावर थेट परिणाम करणाऱ्या सिंगापूर येथील बाजारात सोन्याचा भाव 0.४ टक्क्याने वाढून १,१६३.७३ डॉलर प्रति औंस झाला. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ४0 रुपयांनी उतरून अनुक्रमे २६,३३0 रुपये आणि २६,१८0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. काल सोन्याच्या भावात २00 रुपयांची वाढ झाली होती. ८ ग्रॅम सोन्याच्या गिन्नीचा भाव १00 रुपयांनी घसरून २३,000 रुपये झाला. तयार चांदीच्या भावात १0 रुपयांनी वाढ झाली. त्याबरोबर ही चांदी ३५,५१0 रुपये किलो झाली. साप्ताहिक डिलिव्हरीत चांदीचा भाव १८५ रुपयांनी वाढून ३५,४६५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५३ हजार रुपये आणि विक्रीसाठी ५४ हजार रुपये शेकडा असा आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिला.लंडनच्या सोने-चांदी बाजारात सोन्या-चांदीचा भाव वाढला आहे. या बाजारात दोन्ही धातूंचा भाव तीन महिन्यांच्या नीचांकावर गेला होता. शुक्रवारी बाजार उसळला. सोने 0.४ टक्क्यांनी वाढून १,१६३.५९ डॉलर प्रति औंस झाले. गेल्या आठवडाभरात तेथे सोने 0.४ टक्क्यांनी घसरले होते. चांदीचा भावही 0.४ टक्क्यांनी वाढून १५.४६ डॉलर प्रतिऔंस झाला.

 (लोकमत न्यूज नेटवर्क)