Join us  

सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी घसरण

By admin | Published: September 04, 2015 10:13 PM

जागतिक, तसेच स्थानिक बाजारात व्यापारी वर्गाकडून कमी होत चाललेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली; मात्र चांदी वधारली.

नवी दिल्ली : जागतिक, तसेच स्थानिक बाजारात व्यापारी वर्गाकडून कमी होत चाललेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली; मात्र चांदी वधारली.सोने ८० रुपयांनी स्वस्त होऊन २६,७३० रुपयांवर आले. दुसरीकडे चांदी २७५ रुपयांनी वधारून ३५,५७५ प्रति कि़ ग्रॅ. असा भाव झाला. उद्योग आणि नाण्याचे उत्पादन करणाऱ्यांकडून मागणी वाढल्याने चांदीचा भाव वाढला.युरोपीय केंद्रीय बँकेने भांडवल गुंतवणूक वाढविण्याचे संकेत दिल्याने डॉलर बळकट झाला. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी मात्र कमी झाली. जागतिक स्तरावर सोन्याचा भाव ०.०८ टक्क्यांनी घसरून सिंगापूर बाजारात तो १,१२४.१० प्रति आँस असा झाला. त्याचबरोबर देशांतर्गत व्यापाऱ्यांकडून मागणी नसल्याचाही परिणाम झाला. गेल्या दोन दिवसांत सोने २५० रुपयांनी स्वस्त झाले.दुसरीकडे चांदीचा भाव मात्र चढाच आहे. चांदी २७५ रुपयांनी वधारून ३५,५७५ रुपये प्रति कि.ग्रॅ. झाली. साप्ताहिक डिलेव्हरीचा भावही २५५ रुपयांनी वाढून ३४,९३० रुपये प्रति कि.ग्रॅ. झाला. चांदीच्या नाण्याच्या खरेदीचा दर ५१ हजार रुपये, तर विक्रीचा दर ५२ हजार रुपये (१०० नाणी) असा होता.