जळगाव/नागपूर : अमेरिकेमधील बँका एकामागून एक डबघाईला जात असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीमध्ये गुंतवणूक वाढू लागली आहे. शनिवारी सोने व चांदीत एकाच दिवसात प्रत्येकी १,३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने नागपुरात ६०,१०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. तर जळगावात दर ५९,८०० रुपये प्रति तोळा झाला. सोन्याचा आतापर्यंतचा हा उच्चांकी भाव ठरला आहे. पक्की चांदी नागपुरात ६९,१०० रुपये तर जळगावात ६८ हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहाेचली आहे.
सुवर्ण बाजार नवीन उच्चांकावर
सोने ७ ऑगस्ट २०२० रोजी ५७,२०० रुपये प्रति तोळ्यावर पोहाेचले होते. २६ जानेवारी २०२३ रोजी ५७,९५० रुपये, १ फेब्रुवारी रोजी ५८,१५० रुपये, २ फेब्रुवारी रोजी ५९,१५० रुपयांवर पोहाेचले होते. आता १८ मार्च रोजी थेट ६०,१०० व ५९,८०० रुपये प्रति तोळ्याची पातळी गाठली आहे.
कॅरेटनिहाय भाव
२४ कॅरेट ५९,८००
२२ कॅरेट ५४,७८०
१८ कॅरेट ४४,८५०
(दर जळगावमध्ये)
भाववाढीचा हा ट्रेंड कायम राहिला तर दिवाळीला सोने ७०-७२ हजार होऊ शकते.