- विजयकुमार सैतवाल
जळगाव : सोन्याच्या भावात एकाच आठवड्यात तब्बल १२०० रुपये प्रती तोळ््याने वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमती वाढण्यासह डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात झालेली घसरण, तसेच लग्नसराईमुळे वाढलेली मागणी आदी कारणे यामागे आहेत.
३० नोव्हेंबर रोजी ३० हजार ९०० रुपयांवर असलेले सोने ८ डिसेंबर रोजी ३२ हजार १०० रुपये प्रती तोळ्यावर पोहोचले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने- चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यानुसार आताही आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वधारल्याने भारतातही सोन्याचे भाव वाढले आहे. या सोबतच गेल्या आठवड्यात ७०.७२ रुपयांवर असलेल्या अमेरिकन डॉलरचे दर रविवारी ७१. ७२ रुपयांवर पोहचल्याने सोन्याच्या भाववाढीस मदत होत आहे.
दररोज १०० ते ३०० रुपयांनी वाढ
गेल्या आठवड्यापासून सोन्यामध्ये दररोज १०० ते ३०० रुपये प्रती तोळ््याने वाढ होत आहे. ३० नोव्हेंबर रोजी ३० हजार ९०० रुपये प्रती तोळा असलेल्या सोन्याच्या भावात एकाच दिवसात २०० रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन ते ३१ हजार १०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर अशीच वाढ सुरू राहून ४ डिसेंबर रोजी सोने ३१ हजार ३०० रुपये प्रती तोळा झाले. पुन्हा ५ रोजी सोने ३१ हजार ४०० रुपये, ६ रोजी ३१ हजार ७०० रुपये, ७ रोजी ३१ हजार ९०० रुपयांवर सोने पोहचले आणि ८ डिसेंबर रोजी २०० रुपयांनी वाढ होऊन सोने ३२ हजार १०० रुपये प्रती तोळा झाले.
चांदीच्या दरातही ५०० रुपयांनी वाढ चांदीच्या भावातही एकाच दिवसात ५०० रुपयांनी वाढ होऊन, ती ३९ हजार रुपये प्रती किलोवरून ३९ हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे. ५ डिसेंबर रोजी चांदी ३९ हजार रुपयांवर होती. ती ६ डिसेंबर रोजी ३९ हजार ५०० रुपये प्रती तोळा झाली. ती ३९ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे.
लग्नसराईमुळे वाढली मागणी
दसरा, दिवाळी काळात सोन्याची मोठी मागणी वाढल्याने दिवाळीमध्येदेखील सोने ३२ हजारांच्या पुढे गेले होते. मात्र त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव कमी झाल्याने व डॉलरच्या तुलेत भारतीय रुपयात सुधारणा झाल्याने सोन्याचे भाव गडगडले होते. तरीदेखील त्या काळात सोन्याला मागणी नव्हती. मात्र लग्नसराई सुरू होताच सोन्याला मागणी वाढली असून सुवर्णनगरी जळगावातील सुवर्णपेढ्या ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत.
आठवडाभरात सोन्याच्या भावात १,२०० रुपयांनी वाढ
सोने पुन्हा ३२ हजारांच्या पुढे; आंतरराष्ट्रीय पातळीवर किमती वाढण्यासह रुपयाच्या घसरणीचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 06:30 AM2018-12-10T06:30:30+5:302018-12-10T06:30:50+5:30