मुंबई : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर डावेरी बाजारसह मुंबई शहर आणि उपनगरातील सराफांच्या दुकानांत सोन्याच्या खरेदीसाठी लगबग सुरु झाली असून, आता प्रतितोळा ५२ हजार रुपयांच्या आसपास असणारा सोन्याचा भाव दिवाळीनंतर मात्र ५३ हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता सराफ बाजाराने व्यक्त केली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर सोने महागणार असल्याने दिवाळीदरम्यानच सोन्याच्या खरेदी-विक्रीने मोठा जोर पकडल्याचे चित्र आहे.
ग्राहक सोन्याची बुकिंग करत आहेत. यामध्ये कानातले आणि बांगड्या यांचा समावेश आहे. दिवाळीला सोन्याची खरेदी ही शुभ मानली जाते. याचा सारासार विचार करत बहुतांशी ग्राहक सोन्याची नाणी खरेदी करण्यावर अधिकाधिक भर देत आहेत.
- कुमार जैन, अध्यक्ष, मुंबई ज्वेलर्स असोसिएशन
सोने ५२ हजारांवर
१. दिवाळीदरम्यान सोन्याचा भाव हा प्रतितोला ५२ हजार रुपयांच्या आसपास आहे.
२. दिवाळीपूर्वी हा ५३ हजारांच्या आसपास होता. त्यापूर्वीही सोन्याचा भाव ५५ हजारांवर होता.
३. गेल्या दोन वर्षात २ सोन्याचे भाव ४८ हजारांपासून ५५ हजारांदरम्यान वरखाली होत आहेत.
४. बऱ्याच अंशी सोन्याचा भाव ५२ हजार रुपये प्रतितोळा असा खिळला आहे.
>> दिवाळीत सोन्याची नाणी खरेदी करण्यावर भर आहे.
>> गेल्या वर्षी देशभरात ८० टन सोन्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले.
>> सोन्याची खरेदी-विक्री यावर्षी १२० टन होईल.
सोने कुठून येते?
सरकार जे सोने आयात करते ते सोने झवेरी बाजारात येते. मग येथील होलसेल व्यापारी सोने बँक, सरकारकडून खरेदी करतात. सोने आयात होते. तेथून सोन्याचे वितरण होते.
युद्ध, व्याजदर आणि सोन्याचे भाव
युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याजदर या घटकांवर सध्या सोन्याचे भाव अवलंबून आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घडामोडींचाही सोन्याच्या भावावर परिणाम होत असतो. त्यामुळे सोन्याचे भाव सातत्याने कमी - अधिक होत असतात.