Dhanteras 2024 : आजपासून देशभरात दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. लोक विविध प्रकारच्या खरेदीचा आनंद लुटत आहेत. धनत्रयोदशीला (Dhanteras) लोक आवर्जून सोने खरेदी करतात. पण, सध्या पिवळा धातू किमतीचे नवेनवे उच्चांक गाठत आहेत. गेल्या धनत्रयोदशीला सोन्याचा भाव सुमारे ६० हजार रुपये प्रति तोळा होता. यंदा ७८ हजार रुपये प्रति १० ग्रॅमचा (तोळा) आकडा पार केला आहे. सोन्याने गेल्या दिवाळीपासून आतापर्यंत ३० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. आता सोन्याचा भाव १ लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा आकडाही गाठू शकतो, असा बाजार तज्ज्ञांचा अंदाज आहे.
धनत्रयोदशीला सोन्या-चांदीची मोठी खरेदी अपेक्षित
बाजाराचा कल पाहता या दिवाळीत आणि धनत्रयोदशीलाही सोन्या-चांदीची मोठी खरेदी होईल, असा अंदाज आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, दिवाळी २०२३ पासून आतापर्यंत सोन्याचे दर लक्षणीय वाढले आहेत. निफ्टी ५० इंडेक्सच्या २८ टक्के परताव्याच्या तुलनेत गुंतवणूकदारांना अधिक लाभ दिला आहे. २०२४ मध्येच सोन्याच्या किमतीत सुमारे २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इक्विटी रिटर्न्सपेक्षा सोन्याने चांगला परफॉर्मन्स दिला आहे. बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, सेन्सेक्स यावर्षी केवळ ११ टक्के परतावा देऊ शकला आहे.
या दिवाळीत सोने ८० हजारांचा आकाडा ओलांडणार?
एवढ्या उच्च किंमती असूनही सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे अहवालात म्हटले आहे. धनत्रयोदशीला सोने ८० हजार रुपयांचा आकडा पार करू शकतो. जागतिक अर्थव्यवस्था आणि इराण-इस्रायल संघर्ष परिस्थिती पाहता गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहतात. तरलतेबरोबरच, ते महागाईच्या प्रभावापासून तुमचे रक्षण करते. प्रत्येक उदयोन्मुख अर्थव्यवस्थेत सोन्याची खरेदी सातत्याने वाढत आहे.
दिवाळी २०२५ पर्यंत सोने १ लाखांचा आकडा गाठणार?
बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोन्याव्यतिरिक्त तुम्ही गोल्ड ईटीएफ आणि सार्वभौम गोल्ड बाँडमध्येही गुंतवणूक करू शकता. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ मानली जाते. पुढील दिवाळी आणि धनत्रयोदशीपर्यंत तुम्ही १ लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या लक्ष्यासह सोने खरेदी करू शकता. दिवाळी २०२५ पर्यंत त्याची किंमत १,०३,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. गेल्या पाच वर्षांत सोन्याचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत.