Join us

सोनं ३६ हजार रुपयांनी स्वस्त होणार? अमेरिकन फर्म मॉर्निंगस्टारचा दावा; कारणंही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:55 IST

Gold Price Down : भारतीय किरकोळ बाजारात सोन्याच्या किमतीने ९१ हजार रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे. आगामी काळात सोन्याच्या किमती ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतात, असा दावा अमेरिकन संस्थेने केला आहे.

Gold Price Down : सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी आता दिवास्वप्न झालं आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला जर सांगितलं की येत्या काळात सोन्याचे भाव ४० टक्क्यांहून अधिक घसरतील, तर विश्वास बसेल का? पण, असा दावा आम्ही नाही तर अमेरिकेतील एका प्रसिद्ध संस्थेने केला आहे. सध्या भारतीय किरकोळ बाजारात सोन्याचा भाव ९१ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे गेला आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमती ३५ ते ४० टक्क्यांनी वाढल्या असून २०२५ पर्यंत सोने सुमारे १० हजार रुपयांनी महागले आहे. पण, यात घट होणार असून सोने तब्बल ३६ हजार रुपयांनी स्वस्त होण्याचा दावा करण्यात आला आहे. 

अमेरिकन विश्लेषक फर्म मॉर्निंगस्टारने हा दावा केला आहे. त्यांच्या मते सोन्याच्या किमतीने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. पण, येत्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात मोठी घसरण होऊ शकते. ही घट ३८% पेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे. असे झाल्यास दागिने खरेदी करणाऱ्यांना मोठा फायदा होईल, पण गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकते.

सोन्याचा भाव किती उतरणार?सध्या भारतीय बाजारपेठेत २४ कॅरेट सोन्याची किंमत ९१,००० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. जागतिक बाजारात ती प्रति औंस ३,१०० डॉलरच्या वर आहे. मॉर्निंगस्टारच्या मते, जर जवळपास ४०% ची संभाव्य घसरण झाली, तर भारतात सोन्याची किंमत ५५,००० रुपये प्रति १० ग्रॅम होऊ शकते. जागतिक बाजारात सोन्याच्या किमती १,८२० डॉलर प्रति औंसपर्यंत घसरू शकतात.

सोन्याच्या किमती कशामुळे घसरू शकतात?सोन्याच्या किमतीत अलीकडची वाढ आर्थिक अनिश्चितता, महागाईची चिंता आणि भू-राजकीय तणावामुळे झाली आहे. विशेषत: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याची निवड केली. आता असे बरेच घटक आहेत जे या किमती कमी करू शकतात.

  • सोन्याचा पुरवठा वाढणे : सोन्याला मागणी वाढल्याने त्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत, खाणकामाचा नफा सुमारे ९५० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला. जागतिक साठा देखील ९% ने वाढून २,१६,२६५ टन झाला आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे.
  • घटती मागणी : एकीकडे उत्पादनात वाढ झाली असताना दुसरीकडे सोन्याच्या धातूची मागणी घटली आहे. जगभरातील मध्यवर्ती बँका, ज्यांनी गेल्या वर्षी १,०४५ टन सोने खरेदी केले होते, ते आता खरेदी कमी करू शकतात. जागतिक सुवर्ण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की ७१% मध्यवर्ती बँका त्यांच्या सोन्याचा साठा कमी करण्याचा किंवा सध्याच्या पातळीवर ठेवण्याचा विचार करत आहेत.
  • मार्केट सॅच्युरेशन : सन २०२४ मध्ये सोन्याच्या क्षेत्रातील विलीनीकरण आणि अधिग्रहणांमध्ये ३२% वाढ झाली आहे, ही वाढ म्हणजे शिखर आहे. शिवाय, सोने-समर्थित ETF मधील वाढीनेही सर्वोच्च पातळी गाठली आहे.

वाचा - आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव; बँकांमध्ये ७,००० कोटींची FD, डॉलरमध्ये येतो पैसा

बोफा-सॉक्‍सचा विपरित दावाएकीकडे सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होईल, असा दावा जॉन मिल्स करत आहेत, तर दुसरीकडे बोफा आणि सॉक्स यांसारख्या प्रमुख वित्तीय संस्था सोन्याचे दर वाढतच राहतील, असा विश्वास आहे. तर बँक ऑफ अमेरिकाच्या अंदाजानुसार सोन्याची किंमत पुढील दोन वर्षांत ३,५०० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते, तर गोल्डमन सॉक्सचा अंदाज आहे की २०२५ च्या अखेरीस सोन्याची किंमत ३,३०० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. 

टॅग्स :सोनंगुंतवणूकशेअर बाजार