Gold Price Today: जागतिक बाजारातील वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या फ्युचर्समध्ये सोमवारी १,४९३ रुपयांची मोठी वाढ झाली आणि ९६,००० रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी ओलांडली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) जून डिलिव्हरीसाठी सोन्याच्या कॉन्ट्रॅक्टनं सलग तिसऱ्या सत्रात जोरदार कामगिरी कायम ठेवली आणि सुरुवातीच्या व्यवहारात १,४९३ रुपये म्हणजेच १.५७ टक्क्यांनी वधारून ९६,७४७ रुपये प्रति १० ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला.
विक्रमी उच्चांकावरून थोडा खाली येत सोन्याचा भाव १,३४६ रुपये म्हणजेच १.४१ टक्क्यांनी वाढून ९६,६०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्यात २१,५४० लॉटचा व्यवहार झाला. त्याचप्रमाणे ऑगस्ट डिलिव्हरीचा फॉलोऑन कॉन्ट्रॅक्ट एमसीएक्सवर १,४६४ रुपये म्हणजेच १.५३ टक्क्यांनी वाढून ९७,३६० रुपये प्रति १० ग्रॅमच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला. गुड फ्रायडेनिमित्त शुक्रवारी कमॉडिटी बाजार बंद होते.
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
काय म्हणताहेत एक्सपर्ट्स?
अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार तणावामुळे जागतिक अनिश्चितता वाढली असून, गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणूकीचा शोध घ्यावा लागत असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये तोडगा निघत नाही, तोपर्यंत सोन्याची वाढ सुरूच राहण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात सोन्याचा वायदा भाव ३,४००.८६ डॉलर प्रति औंस वर पोहोचला आहे.
कमकुवत अमेरिकी डॉलर आणि जागतिक व्यापाराच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून खरेदी केल्यामुळे सोन्याचे दर नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या गुरुवारी अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यावर सातत्यानं हल्लाबोल केल्यानंतर अमेरिकन डॉलरनं दोन वर्षांतील नीचांकी पातळी गाठली आहे. त्यांचे कर्मचारी पॉवेल यांना बदलण्याचा विचार करीत आहेत, हे पाऊल मध्यवर्ती बँक आणि जागतिक बाजारपेठेच्या स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम करेल, अशी प्रतिक्रिया मेहता इक्विटीज लिमिटेडचे उपाध्यक्ष (कमोडिटीज) राहुल कलंत्री यांनी दिली.