जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून अस्थिर झालेल्या सुवर्ण बाजारात अजूनही ही अस्थिरता कायम आहे. त्यामुळेच एरव्ही पितृपक्षात कमी होणारे सोने-चांदीचे भाव यंदा मात्र वाढत आहे. याचाच परिणाम म्हणजे आठवड्याभरात चांदीचे भाव दीड हजार रुपयांनी वाढून ते ६६ हजार ५०० रुपये प्रतिकिलो तर सोन्याचे भाव ७०० रुपयांनी वाढवून ५२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने भाववाढ होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात एक महिन्यापासून मात्र घसरण पहायला मिळाली. मध्यंतरी ३१ ऑगस्टला चांदीच्या भावात दोन हजार रुपयांनी वाढ होऊन ती ६८ हजार रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर मात्र पुन्हा घसरण सुरू झाली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून पुन्हा भाववाढ होत आहे. गेल्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी ६५ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात वाढ होत जाऊन ती आता ६६ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी ५१ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर असलेल्या सोन्याच्या भावात ७०० रुपयांनी वाढ होऊन ते पुन्हा ५२ हजार रुपयांच्या पुढे जाऊन ५२ हजार २०० रुपये प्रतितोळा झाले आहे.
यंदा उलट चित्र
दरवर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यापासून सोने-चांदीच्या मागणीत घट होऊन त्यांचे भावही घसरतात. त्यात पितृपक्षात तर हे भाव आणखी कमी होतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सुवर्ण बाजारातील अस्थिरतेमुळे पितृपक्षातही सोने-चांदीचे भाव वाढत आहे. दलालांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे सातत्याने भाव अचानक कमी-जास्त होऊन बाजारात अस्थिरता निर्माण होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
अस्थिरता कायम
२४ ऑगस्ट रोजी चांदी ६६ हजार रुपये प्रतिकिलोवर आली होती. त्यानंतर पुन्हा २६ ऑगस्ट रोजी चांदीच्या भावात दोन हजार रुपयांनी घसरण होऊन ती ६४ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. मात्र सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी भाववाढ होऊन ती ६८ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. त्यानंतर पुन्हा घसरण होत जाऊन ती ७ सप्टेंबर रोजी ६६ हजार रुपयांवर आली. पुन्हा ९ सप्टेंबरला आणखी एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ६५ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. आता पुन्हा आठवडाभरात चांदी दीड हजार रुपयांनी वाढून ६६ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोन्याच्या भावात असाच चढ-उतार सुरू असून गेल्या आठवड्यात ९ सप्टेंबरला ५१ हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात ७०० रुपयांनी वाढ होऊन ते ५२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.
Gold Prices Today : सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढले, चांदी दीड हजारांनी महागली, असे आहेत आजचे दर
आठवड्याभरात चांदीचे भाव दीड हजार रुपयांनी वाढून ते ६६ हजार ५०० रुपये प्रतिकिलो तर सोन्याचे भाव ७०० रुपयांनी वाढवून ५२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 02:04 PM2020-09-16T14:04:40+5:302020-09-16T14:08:23+5:30