जगातील सोन्याचा दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता हा भारत देश आहे. मोदी सरकार सोन्याच्या निर्यातीवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकार आणि सर्राफा बाजारातील सुत्रांच्या हवाल्यानुसार केंद्र सरकार सोन्यावरील आयात करात मोठी कपात करण्याच्या विचारात आहे.
सोन्याच्या दरात आज कपात झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात ४० रुपयांची घसरण झाली. यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम 56,840 रुपये झाला आहे. शुक्रवारी सोन्याचा दर 56,880 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला होता. चांदीच्या दरातही 85 रुपयांची घट झाली असून प्रति किलोचा दर 68,980 रुपये आहे.
सोन्याची तस्करी करणाऱ्यांना दणका देण्यासाठी सरकार हा निर्णय घेऊ शकते, असे मानले जात आहे. सोन्याच्या आयातीवर जास्त कर असल्याने सोने तस्करांसाठी बाहेरून सोने आणणे फायद्याचे ठरत होते. परंतू, असे सोने आणल्याने भारतातील सोने बाजारावर त्याचा परिणाम होत होता. कोणताही कर भरत नसल्यामुळे सोन्याचे तस्कर बँकांचा मोठा हिस्सा आणि सोन्याच्या व्यापाऱ्यांचा मोठा हिस्सा हिसकावून घेत होते.
पुढील महिन्यापासून लगीन सराई सुरु होणार आहे. यामुळे देशात सोन्याची मागणी वाढेल. याच्याच तोंडावर सोन्यावरील आयात कर कमी केल्यास देशातील सोन्याची मागणी वाढेल असा सरकारचा अंदाज आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशांतर्गत सोन्याच्या रिफायनरीजमधील काम ठप्प होते. कारण ते काळ्या बाजारातील सोन्याच्या तस्करांच्या दरांसोबत स्पर्धा करू शकत नव्हते. सरकारला सोन्याचे सध्याचे इम्पोर्ट टॅक्स १२ टक्क्यांनी कमी करायचे आहेत. एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, या मसुद्यावर चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय घेतला जाईल. सध्या सरकारकडून सोन्यावर 18.45% शुल्क आकारले जाते. यामध्ये 12.5 टक्के आयात शुल्क, 2.5 टक्के कृषी पायाभूत सुविधा उपकर आणि इतर करांचा समावेश आहे.