नागपूर : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम देशांतर्गत स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये दरदिवशी दिसून येत आहे. चालू आठवड्यात नागपुरात सोन्याचे दर ३ टक्के जीएसटीसह ९०,८४६ रुपये आणि चांदी १,०३,५१५ रुपयांवर पोहोचली. विक्रमी वाढीमुळे दागिने खरेदी करणाऱ्यांची झोप उडाली आहे. (Gold Price Today Nagpur)
गुरुवारच्या ८७,१०० रुपयांच्या तुलनेत शनिवारी सोने १,१०० रुपयांनी वाढून ८८,२०० आणि चांदी १,४०० रुपयांच्या वाढीसह १,००,५०० रुपयांवर पोहोचली. याआधी चांदीने एक लाख रुपयांचा आकडा गाठला होता. आठवड्याची दरवाढ पाहिल्यास सोने १,९०० रुपये आणि चांदीत ३,५०० रुपयांची वाढ झाली. सोने आणि चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसत आहे.
एका आठवड्यात सोन्याच्या किंमती किती वाढल्या?
तुलनात्मकरित्या शनिवार, ८ मार्चच्या तुलनेत सोमवार १० मार्चला दहा ग्रॅम शुद्ध सोने १०० रुपयांनी वाढून ८६,४०० आणि चांदी ६०० रुपयांच्या वाढीसह ९७,६०० रुपयांवर पोहोचली. मंगळवारी सोन्यात १०० रुपयांची घसरण तर चांदीचे भाव स्थिर होते. बुधवारी सोन्यात १०० रुपये आणि चांदीत २०० रुपयांची वाढ झाली. गुरुवारी ७०० रुपयांच्या वाढीसह सोने ८७,१०० आणि चांदीत ३०० रुपयांची वाढ झाली. शनिवारी बंद बाजारात सोन्याचे दर १,१०० रुपयांनी वाढून ८८,२०० रुपये आणि चांदी १,४०० रुपयांनी वाढून भावपातळी १,००, ५०० रुपयांवर पोहोचली.
सोने घडणावळीवर १३ ते २३ टक्के शुल्क
प्रत्येक सराफाच्या दुकानात दोन्ही मौल्यवान धातूंचे दर जीएसटीविना डिस्प्ले केले असतात. ग्राहकांनी दागिना खरेदी केल्यानंतर सोन्याच्या मूळ किमतीवर ३ टक्के जीएसटी आणि किमान १३ ते कमाल २३ टक्क्यांपर्यंत घडणावळ शुल्क वेगळे आकारले जाते. त्यामुळे सध्याच्या भावानुसार शुद्ध दहा ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसाठी ग्राहकाला लाख रुपयांवर रक्कम मोजावी लागते. सराफांनी दुकानातील डिस्प्ले बोर्ड पारदर्शक ठेवावा, अशी ग्राहकांची मागणी आहे.