आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम देशातही पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात ३५१ रुपयांची घट होऊन प्रति १० ग्रॅम सोनं ५१,४५२ रुपयांवर आलं आहे. HDFC सिक्युरिटीजनं ही माहिती दिली आहे. याआधीच्या सत्रात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ५१,८०३ रुपयांवर बंद झाला होता. चांदीच्या दरातही ५६१ रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. चांदीचा दर ६८,१८२ रुपये प्रतिकिलो इतका आहे. याआधीच्या सत्रात चांदीचा दर ६८,७४३ रुपये प्रतिकिलो इतका होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण होऊन १,९३३ डॉलर प्रतिऔंस इतका नोंदवला गेला. तर चांदीच्या दरात २५.१० डॉलर प्रतिऔंस इतका राहिला. HDFC सिक्युरिटिजचे संशोधन विश्लेषक तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी न्यूयॉर्क स्थित जिंस एक्स्चेंज कॉमेक्समध्ये सोन्याचा दर एक टक्क्यांहून अधिक घसरून १,९३३ डॉलर प्रतिऔंस इतका नोंदवला गेला.
मुंबईत सोनं-चांदीचा दर काय?
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सोन्याचा दर आज ५१,४८४ रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदविण्यात आला आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलोसाठी ६७,५९२ रुपये इतका आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला एकंदर मरगळ आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार सोन्याचा दर यंदाच्या वर्षात ५५ हजारांचा आकडा गाठण्याची दाट शक्यता आहे. तर पुढच्या वर्षी सोनं ६२ हजारांवर पोहोचू शकतं.