Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुढीपाडव्याला सोन्याची झळाळी वाढणार; 10 वर्षांतला विक्रम मोडणार

गुढीपाडव्याला सोन्याची झळाळी वाढणार; 10 वर्षांतला विक्रम मोडणार

उद्या खरेदीत 10 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 06:38 PM2019-04-05T18:38:18+5:302019-04-05T18:42:19+5:30

उद्या खरेदीत 10 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज

gold rates at 33500 for per 10 gram ahead of gudi padwa | गुढीपाडव्याला सोन्याची झळाळी वाढणार; 10 वर्षांतला विक्रम मोडणार

गुढीपाडव्याला सोन्याची झळाळी वाढणार; 10 वर्षांतला विक्रम मोडणार

- चेतन ननावरे

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची झळाळी वाढणार आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचा प्रति तोळ्यामागचा दर 33 हजारांवर जाऊन पोहोचला आहे. आज सराफा बाजारात प्रति तोळा सोन्यासाठी वस्तू व सेवा करासह ३३ हजार ५०० रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या १० वर्षांत प्रथमच सोन्यानं हा उच्चांक गाठल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव कुमार जैन यांनी दिली.

कुमार जैन यांनी सांगितले की, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला ग्राहक सोने खरेदीसाठी झवेरी बाजारासह अन्य बाजारपेठांत मोठी गर्दी करतात. गतवर्षी १८ मार्चला गुढीपाडवा होता. त्यावेळी प्रति तोळा सोन्याचा दर ३० हजार २२४ रुपये होता. मात्र गेल्या वर्षभरात सातत्याने सोन्याच्या दरात वाढ झाली. आज सोन्याचा प्रति तोळा दर ३२ हजार ५०० रुपये इतका आहे. त्यावर सुमारे १ हजार रुपये वस्तू व सेवा कर आकारल्याने प्रति तोळा सोन्यासाठी ग्राहकांना ३३ हजार ५०० रुपये मोजावे लागत आहेत. सोन्याच्या दरात वाढ झाली असली, तरी खरेदीतील उत्साह मात्र तसूभरही कमी झाला नसल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.

मुहूर्तामुळे काही प्रमाणात का होईना ग्राहक खरेदीसाठी राज्यातील बाजारपेठांमध्ये जमत असल्याचे संघटनेने सांगितले. याशिवाय लग्नसराईचा काळ सुरू झाल्याने सोन्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. मुंबईत तितका प्रतिसाद नसला, तरी इतर ठिकाणी ग्राहकांकडून सोन्याला मोठी मागणी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. परिणामी, राज्यात गुढीपाडव्याला सराफा बाजारांतील उलाढालीत १० टक्क्यांची वृद्धी दिसेल, अशी अपेक्षा सराफा बाजारातून व्यक्त होत आहे.

गेल्या पाच वर्षांत गुढीपाडव्याला असलेले सोन्याचे दर (प्रति तोळा)
वर्ष                      सोन्याचे दर (रु.)
१८ मार्च, २०१८    ३०,२२४
२९ मार्च, २०१७    २८,६५१
८ एप्रिल, २०१६    २८,९७४
२१ मार्च, २०१५    २६,१७०
३१ मार्च, २०१४    २८,५११
 

Web Title: gold rates at 33500 for per 10 gram ahead of gudi padwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.