अर्थसंकल्पाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना केंद्र सरकारने सोन्या चांदीच्या आयात शुल्कात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
सोने आणि चांदी तसेच मौल्यवान धातूंच्या नाण्यांवर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 22 जानेवारीला हा निर्णय घेण्यात आला असून मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क 15 टक्के करण्यात आले आहे. यामध्ये 10 टक्के मूळ सीमाशुल्क आणि 5 टक्के कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर (AIDC) असे शुल्क लावण्यात येत आहे.
सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 12.50 टक्क्यांवरून 15 टक्के केले आहे. सोने आणि चांदी वापरलेल्या वस्तूंवरही शुल्क वाढविण्यात आले आहे. सोने आणि चांदीच्या स्क्रू, हुक आणि नाण्यांवर हे वाढीव शुल्क आकारले जाणार आहे. हे नवे शुल्क 22 जानेवारी पासून लागू करण्यात आले आहे.
दरम्यान आज 23 जानेवारी रोजी देशांतर्गत वायदे बाजारात व्यापाराच्या सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत वाढ झाली. अमेरिकन डॉलर घसरल्याने सोन्याच्या किमतीत वाढ पहायला मिळाली आहे.
काय होणार परिणाम...देशातील सोन्या, चांदीचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. परंतु त्यावरही आयात शुल्काचा मोठा परिणाम असतो. आता अर्थमंत्रालयाने आयात शुल्क वाढविल्याने सोन्या-चांदीच्या किमतीवर परिणाम होणार आहे. सोने, चांदी, हिरे आणि रंगीत हिरे यांच्या कच्च्या मालासाठी भारत दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. यामुळे आयात शुल्क वाढविल्याने या धातूंच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.