Gold Rates Budget : अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात (Gold-Silver Import Duty) पाच टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुल्कवाढीनंतर सोन्याची वाढती तस्करी रोखण्यासाठी आयात शुल्क १५ टक्क्यांच्या खाली आणण्याचा सरकार गांभीर्यानं विचार करत आहे. सोन्या-चांदीवरील सध्याचं शुल्क १५ टक्क्यांवरून ५ टक्क्यांनी कमी करुन १० टक्क्यांवर आणल्यास सोन्या-चांदीचे दर कमी होतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनं सोनं विकताना ग्राहकांना जीएसटीमध्ये काही सवलती मिळाव्यात, ज्यामुळे आयात कमी होईल आणि सरकारच्या तुटीचा ताण कमी होईल, अशीही चर्चा आहे. या निर्णयामुळे सोन्याच्या दरात सुमारे ३,००० रुपयांची तर चांदीच्या दरात ३,८०० रुपयांची घट होण्याची शक्यता आहे. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (आयबीजेए) राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुल्क कमी झाल्यास सोनं-चांदी स्वस्त होणार आहे.
तस्करीला आळा बसेल
ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे सरचिटणीस नितीन केडिया यांनी या निर्णयामुळे तस्करीला आळा बसेल, असं म्हटलं. सरकारनं जीएसटी १८ टक्क्यांपर्यंत कमी केला आणि सीमा शुल्क शून्य केले तर तस्करी पूर्णपणे थांबू शकते. जुनं सोनं देताना ३ टक्के जीएसटी काढून टाकला तर हे इन्सेन्टिव्ह मोठं असेल, ज्यामुळे सोन्याची आयातही कमी होईल, असं त्यांनी नमूद केलं. मात्र, शुल्क कमी केल्यानं किमती फारशा कमी होणार नाहीत, असं एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमॉडिटी आणि करन्सी प्रमुख अनुज गुप्ता म्हणाले.