Join us

झळाळी उतरली; महिन्याभरात सोन्याच्या दरात हजार रुपयांची घट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 3:19 PM

येत्या काही दिवसांत सोन्याचे दर वाढण्याची शक्यता

मुंबई: दिवाळीच्या दिवसात जवळपास 32 हजारांच्या आसपास गेलेल्या सोन्याचा दर आता जवळपास 1100 रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे अनेक सराफा दुकानांमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केली जाते. त्यामुळे या काळात सोन्याचा दर जास्त असतो. या वर्षीदेखील नेमका असाच ट्रेंड पाहायला मिळाला. मात्र दिवाळी संपताच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.नोव्हेंबरच्या सुरुवातीला एक तोळे सोन्याचा दर 31 हजार 900 रुपये इतका होता. 5 ते 8 नोव्हेंबर या दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्याचा दर 31 हजार 695 रुपये ते 31 हजार 465 या दरम्यान होता. आज सोन्याचा दर 30 हजार 827 रुपयांवर आला आहे. गेल्या महिन्याभराचा विचार केल्यास सोन्याच्या दरात प्रति तोळा 1 हजार रुपयांची घट झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याची झळाळी वाढण्याची शक्यता आहे. दोन महिन्यात सोन्याचा दर 31 हजार रुपयांवर जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर 5 एप्रिल 2019 पर्यंत हा दर 31 हजार 208 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. गेल्या महिन्याभरात डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य वधारलं आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे. 4 नोव्हेंबरला 1 डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 72.90 रुपये होतं. मात्र आता रुपयाची स्थिती सुधारली आहे. आज 70.47 रुपये इतकं आहे. रुपयाचं मूल्य वधारल्यानं सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी सध्या लोकांची झुंबड उडताना दिसत आहे. येत्या काही दिवसात सोन्याच्या किमतीत वाढ होणार असल्याची शक्यता असल्यानं अनेक जण गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले आहेत.  

टॅग्स :सोनं