आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला आहे. यामुळे भारतीय बाजारातील सोन्या, चांदीच्या दरात घसरण नोंदविली गेली. एमसीक्सवर डिसेंबरच्या सोन्याच्या (Gold Rates) वायदा भावात 0.55 टक्क्यांची घट झाली. यामुळे सोने 50826 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. 253 रुपयांनी सोन्याची किंमत कमी झाली आहे. तीन दिवसांनंतर आज पहिल्यांदाच सोन्याचे दर घसरले आहेत.
तर चांदीच्या (Silver) दरातही घसरण नोंदविली गेली. चांदी 1.2 टक्क्यांनी घसरून 62343 रुपये प्रति किलोवर आली आहे. गेल्या सत्रात सोन्याच्या किंमतीत 0.55 टक्के वाढ आणि चांदीच्या किंमतीत 0.26 टक्के वाढ झाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारीही सोन्या चांदीच्या दरात घट झाली होती. मात्र, डॉलर वधारल्याने त्याचा फायदा मिळाला नव्हता. आज सोन्याचा हाजिर भाव 0.1 टक्क्यांनी घटून 1919.51 डॉलर प्रति औंस झाला आहे. तर चांदीचा भाव 0.4 टक्क्यांनी घसरून 25.02 डॉलर प्रति औस झाला आहे. प्लॅटिनमचा दर 873.46 डॉलरवर आहे. आजही डॉलरचा अन्य चलनांच्या तुलनेतील भाव 0.09 टक्के वर होता. यामुळे अन्य चलनांसाठी सोने महागले आहे. जगातील सर्वात मोठ्या गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ETF), एसपीडीआरची होल्डिंग सोमवारी 0.48 टक्क्यांनी वाढून 1,277.65 टन झाली होती. अमेरिकेच्या प्रोत्साहन पॅकेजवर अनिश्चितता कायम आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि हाऊस स्पीकर नॅन्सी पॅलोसी यांच्यामध्ये प्रगती खुंटल्यावरून जबाबदार कोण, असा वाद सुरु आहे. दोघेही एकमेकांना दोषी ठरवत आहेत.
एमसीएक्स आणि लोकल दर वेगवेगळे का? चंद्रशेखर टिळक म्हणतात, होलसेल प्राइज इंडेक्स आणि रिटेल प्राइज इंडेक्स असतो, त्यामुळेच हे दर वेगवेगळे असतात. एमसीक्सवर जे दर असतात, तिथे आपल्याला सोन्याची डिलेव्हरी मिळत नाही. कॅमॉडिटी मार्केटचा जो रेट आहे, त्यानुसार तिथून आपण डिलिव्हरी घेतो. त्यामुळे हे दर वेगवेगळे असतात.
सोनं १० ग्रॅम म्हणजे १ तोळा हे कसं ठरलं?टिळक म्हणतात, १ तोळा सोनं हे १० ग्रॅम दशमान पद्धतीत बसवणं सोपं जातं. अख्ख्या जगात तशीच पद्धत आहे. १ किलो म्हणजे १००० ग्रॅम असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दर निश्चित करणं सोयीस्कर ठरतं, असंही चंद्रशेखर टिळक म्हणाले आहेत.
यासंदर्भात सुवर्ण व्यावसायिक पराग पेठे यांना विचारलं असता, ते म्हणाले, दोन वर्षांसाठी जर सोन्यात गुंतवणूक केली, तर ती फायदेशीर ठरू शकते. खरेदी आणि विक्रीत प्रत्येक दुकानदाराला मार्जिन ठेवावं लागतं. आज भाव ५१,५०० आहे, जर तुम्ही १०० ग्रॅम सोनं घेतलंत तर त्याचे होतात ५ लाख १५ हजार. हेच जर दोन महिन्यांनी सोनं विकायला आणल्यास ज्वेलर्स हा प्रॉफिट मार्जिन आणि खरेदी-विक्री मार्जिन ठेवूनच विकत घेतो. खऱ्या सोन्यात घट नसते, त्यात बाइंग-सेलिंग मार्जिन असते. डॉलर आणि रुपये असा त्यात फरक असतो, ज्वेलर्स आणि डिलर्स हे दोन प्रकार असतात. डिलर्सकडून सोनं घेतल्यानंतर त्याचे भाव वाढतात, म्हणून एमसीएक्स आणि स्थानिक दरांमध्ये तफावत आढळून येत असते. तसेच जीएसटी लागल्यानं दरांमध्ये फरक पडत असल्याचं सुवर्ण व्यावसायिक पराग पेठे यांनी सांगितलं आहे. मोदी सरकारच्या सॉवरेन गोल्ड बाँड(Sovereign Gold Bond) योजनेंबद्दल विचारले असता ते म्हणाले, आपण उद्याचं नाही सांगू शकत तर सात वर्षं कोण थांबणार, दीर्घकाळासाठी ही योजना फायदेशीर असली तरी कोणीही एवढ्या काळासाठी गुंतवणूक करत नाही.