लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : सुवर्ण बाजारातील अस्थिरतेमुळे मंगळवारपाठोपाठ बुधवारीही एकाच दिवसात सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. यात ६२ हजार रुपयांवरून ६१ हजार रुपये प्रतिकिलोवर, तर सोने ५१ हजार ३०० रुपयांवरून ५० हजार ३०० रुपये प्रति-तोळ्यावर आले. पितृपक्षात भाववाढ झालेल्या सोने-चांदीच्या भावात मात्र अधिकमासात घसरण होत असल्याचे उलट चित्र निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून अस्थिर झालेल्या सुवर्ण बाजारात अजूनही ही अस्थिरता कायम आहे. त्यामुळेच एरव्ही पितृपक्षात कमी होणारे सोने-चांदीचे भाव यंदा मात्र वाढले. परिणामी आठवडाभरात चांदीचे भाव वाढून ते ६८ हजार रुपये प्रतिकिलो तर सोन्याचे भाव ५२ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. मात्र आता अधिक-मासात या दोन्ही धातूंचे भाव कमी-कमी होत आहे.