Join us  

सोन्याला मिळाली आणखी झळाळी

By admin | Published: October 15, 2015 11:52 PM

आगामी दसरा, दिवाळी आणि लग्नाचे दिवस ध्यानात घेऊन व्यापाऱ्यांनी जोरदार खरेदी केल्याने आणि जागतिक बाजारपेठेतही तसाच कल राहिल्याने सोने सलग दुसऱ्या दिवशी ११५ रुपयांनी वधारून

नवी दिल्ली : आगामी दसरा, दिवाळी आणि लग्नाचे दिवस ध्यानात घेऊन व्यापाऱ्यांनी जोरदार खरेदी केल्याने आणि जागतिक बाजारपेठेतही तसाच कल राहिल्याने सोने सलग दुसऱ्या दिवशी ११५ रुपयांनी वधारून २७,३०० रुपयांवर पोहोचले, तसेच औद्योगिक कारखाने आणि नाणे उत्पादक यांच्याकडूनही मागणी वाढल्याने चांदीही १०० रुपयांनी वधारून ३७,४०० रुपये प्रति किलो असा भाव झाला.अमेरिकी फेडरल रिझर्व्ह व्याजाचे दर वाढविण्याची शक्यता नाही, असे दिसताच जागतिक पातळीवर सोन्याने उचल खाल्ली. सिंगापूर मार्केटमध्ये सोने ०.१४ टक्क्याने वधारून १,१८६ डॉलर प्रति औंस असे झाले. चांदीच्या नाण्याचे भावही ५०० रुपयांनी वाढले. चांदीच्या १०० नाण्यांच्या खरेदीचा दर ५२,५०० तर विक्रीचा दर ५३,५०० रुपये झाला. नवरात्र सुरू होऊन तीन दिवस उलटून गेले आहेत. आता येणाऱ्या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दरही वाढण्याची शक्यता आहे.सणासुदीचे दिवस सुरू झाल्यामुळे सोन्या चांदीची मागणी वाढत जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही मौल्यवान धातूचे भाव चढे राहतील, असा अंदाज आहे. दसरा आणि दिवाळी या सणांना सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. त्यानंतर लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)