जळगाव - नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीतील भाववाढ कायम राहत सोमवार, १ एप्रिल रोजी सोन्याच्या भावात एकाच दिवसात ९०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ६९ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. एक तोळा सोने घेण्यासाठी आता जीएसटीसह ७१ हजार ४८२ रुपये मोजावे लागणार आहे. चांदीच्याही भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ती ७६ हजार रुपये प्रति किलोवर पोहाेचली.
२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या अर्थात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या भावात वाढ सुरू झाली. ती महिनाअखेरपर्यंत कायम तर राहिलीच शिवाय नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी, १ एप्रिल रोजी त्यात पुन्हा ९०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ३१ मार्च रोजी ६८ हजार ५०० रुपयांवर असलेले सोने १ एप्रिल रोजी थेट ६९ हजार ४०० रुपये प्रति तोळा झाले.
चांदीत ५०० रुपये वाढतीन दिवस ७५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर स्थिर असलेल्या चांदीच्या भावात सोमवार, १ एप्रिल रोजी ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ७६ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.
महिनाभरात सोने ६३०० रुपयांनी वधारले- मार्च महिना हा सोन्यातील मोठ्या भाववाढीचा ठरला. १ मार्च रोजी सोने ६३ हजार १०० रुपये प्रति तोळा होते. - त्यात भाववाढ होत जाऊन १ एप्रिलपर्यंत ६ हजार ३०० रुपयांनी वाढ झाली व सोने ६९ हजार ४०० रुपये प्रति तोळा झाले.