Join us  

Gold Sale: आर्थिक चणचणीमुळे सोनं खरेदी घटली; धनत्रयोदशीलाही ग्राहक कमी...

By निखिल म्हात्रे | Published: October 24, 2022 1:15 PM

दिवाळी हा सण सर्वच स्तरातील मंडळी साजरी करीत असतात. या सणामध्ये लक्ष्मी पुजनाच्या दिवशी सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते.

लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग: लक्ष्मी पुजनाच्या दिवशी सोने खरेदी करणे फार महत्वाचे मानले जाते. या दिवशी सोने अथवा चांदीची एखादी वस्तू खरेदी केली जाते. परंतु यावर्षी महागाईची झळ ग्राहकांबरोबरच सोने विक्रेत्यांना बसली आहे. यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदीसाठी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. सोन्याचे वाढते दर व आर्थिक मंदीचा फटका विक्रेत्यांना बसला असल्याची माहिती पुजा ज्वेलर्स चे मालक बिधान शामलाल यांनी दिली. 

दिवाळी हा सण सर्वच स्तरातील मंडळी साजरी करीत असतात. या सणामध्ये लक्ष्मी पुजनाच्या दिवशी सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो. त्यामुळे या दिवशी सोने, चांदीची नाणी खरेदीची उलाढाल प्रचंड होते. गेल्यावर्षीच्या तुलनेने यावर्षी सोन्याचे दर दोन ते चार हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे यावर्षी दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदीचा उत्साह कमी असल्याचे दिसून आले आहे. 

या दिवशी सकाळ व संध्याकाळी खरेदीसाठी असणारी ग्राहकांची गर्दी यावर्षी कमी दिसून आली आहे. गेल्या वर्षी सोन्याचा दर 45 हजार रुपये असा होता. तर यावर्षी 51 हजार 995 रुपये इतका झाला आहे. त्याचा परिणाम यावर्षी सोने खरेदीवर झाला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदीसाठी असणारा ग्राहकांची प्रतिसाद अतिशय अल्प प्रमाणात आहे. आर्थिक मंदी व वाढते दर यामुळे सराफ व्यवसायावर संकट आले असल्याची माहिती शिल्पी ज्वेलर्स चे मालक रितेश जैन यांनी दिली. 

या वर्षी लग्नसराई नोव्हेंबरपासूनच सुरू होणार असली तरी ज्या प्रमाणात उरणच्या बाजारातून रायगड, ठाणे, मुंबई या जिल्ह्य़ातील ग्राहकांकडून सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली जाते, त्यातही या वर्षी घट झाल्याची माहिती उरणमधील सोने व्यापाऱ्यांनी सांगितले. सोन्याच्या दरामध्ये वाढ होत असल्याने तसेच अनेक ठिकाणचे इतर व्यवसाय बंद पडू लागल्याने सोनारांकडून सोने खरेदी करण्याऐवजी त्यांच्याकडे सोने गहाण ठेवण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नव्या खरेदीवर परिणाम झाला आहे. या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावरही सोने खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह नव्हता.

टॅग्स :सोनं