Gold Silver Price : भारतात सोन्याच्या किमती सध्या उच्चांकी आहेत; परंतु यामुळे या मौल्यवान धातूंच्या खरेदीवर परिणाम झालेला दिसत नाही. देशातील मजबूत आर्थिक स्थितीमुळे २०२४ मध्ये जानेवारी ते मार्च तिमाहीत वार्षिकआधारे विचार केल्यास भारतात १३६.६ टन इतके सोने खरेदी करण्यात आले आहे, अशी माहिती जागतिक सुवर्ण परिषदेने मंगळवारी दिली. मागील वर्षी याच समान कालावधीत हे प्रमाण १२६.३ टन इतके होते.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून होणाऱ्या सोन्याच्या खरेदीतही वाढ नोंदविली आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत भारताच्या सोन्याच्या मागणीत २० टक्के वाढ झाली. या काळात ७५,४७० कोटींच्या सोन्याची खरेदी करण्यात आली. याच कालखंडात सोन्याच्या दरातही ११ टक्के वाढ झाली. जागतिक सुवर्ण परिषदेने मंगळवारी गोल्ड डिमांड ट्रेंड्स क्यू१ २०२४' हा जागतिक स्तरावरील अहवाल प्रसिद्ध केला. यात सोन्याच्या एकूण मागणीची माहिती आहे.
वर्षभरात देशात ७०० ते ८०० टन सोन्याची मागणी
येणाऱ्या वर्षभरात भारतातून सोन्याची मागणी ७०० ते ८०० टनांपर्यंत राहील, असे जागतिक सुवर्ण परिषदेचे क्षेत्रीय मुख्य अधिकारी सचिन जैन यांनी सांगितले. किमती आणखी वाढल्यास मागणी खालच्या स्तरावर राहील. २०२३ मध्ये संपूर्ण वर्षभरात देशातील सोन्याची मागणी ७४७.५ टन इतकी होती.
९५.५ टन इतक्या सोन्याच्या दागिन्यांची मागणी भारतात नोंदविली गेली. यात ४ टक्के वाढ झाली आहे. ४१.१ टन इतक्या सोन्याच्या विटा, तसेच नाणी यात गुंतवणूक झाली. यात १९ टक्के वाढ नोंदवली गेली.