जळगाव - गुढीपाडवा व अक्षय्य तृतीयेपासून कमोडिटी मार्केटमध्ये भाववाढ होत असलेल्या सोने-चांदीत गुरुवारी(दि. २७) मोठी घसरण झाली. यात सोने ६०० रुपयांनी घसरून ४८ हजार ६२० रुपये प्रतितोळ्यावर आले, तर चांदीत १३०० रुपयांनी घसरून ती ७१ हजार ४०० रुपये प्रतिकिलोवर आली. विशेष म्हणजे गुरुवारी खरेदीपेक्षा विक्रीकडे अधिक कल असल्याचे दिसून आले.
सुवर्णपेढ्या बंद असल्या तरी मल्टिकमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदीत खरेदी-विक्री सुरू आहे. यामध्ये निर्बंध लागू झाल्यानंतर सातत्याने भाववाढ होत गेली. ही भाववाढ सुरूच राहून २६ मेपर्यंत सोने ४९ हजार २२० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले, तर चांदीदेखील ७२ हजार ७०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली होती. मात्र गुरुवार, २७ मे रोजी अचानक विक्रीचा मारा सुरू झाला व भाव गडगडले. यामध्ये सोन्याच्या भावात एकाच दिवसात ६०० रुपयांनी घसरण झाली.
विक्रीचे अधिक प्रमाण
गेल्यावर्षीच्या लाॅकडाऊनदरम्यान व यंदादेखील निर्बंधांदरम्यान सोने-चांदीत गुंतवणूक वाढून खरेदीचे अधिक प्रमाण असल्याचे दिसून आले. मात्र गुरुवारी खरेदीचे प्रमाण ३९ टक्के, तर विक्रीचे प्रमाण ५७ टक्के होते. याशिवाय चार टक्के थांबलेले व्यवहार (होल्ड) होते. दरम्यान, सोने-चांदीच्या भावात घसरण झाली असली तरी हे भाव पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.