सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम भारतीय बाजारातही दिसून येत आहे. सोन्याचा दर आज पुन्हा घसरला आहे. अवघ्या आठवडाभरात सोन्याचा दर 1500 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे. तर गेल्या 3 महिन्याचा विचार करता सध्या सोने आपल्या निच्चांकी पातळीवर आहे.
सोन्या-चांदीचा आजचा दर -
मल्टीकमोडिटी एक्सचेन्जवर (MCX) आज सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा वायदा भाव 0.03 टक्क्यांनी घसरून 50,158 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर वृत्त लिहेपर्यंत सोन्याचा दर 0.07 टक्क्यांनी कमी झाला होता. खरे तर, सकाळच्या सुमारास, बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याच्या दरात किंचितवाढ दिसून आली होती, पण नंतर पुन्हा सोन्याचा दर घसरायला सुरुवात झाली.
चांदीचा विचार करता, आज चांदीच्या दराने उसळी घेतल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी MCX वर चांदीचा दर 0.3 टक्क्यांच्या उसळीसह 58,920 रुपये प्रती किलो ग्रॅमवर पोहोचला आहे. मात्र, वृत्त लिहेपर्यंत चांदीचा दर 359 रुपयांनी वाढून 59,110 रुपयांवर ट्रेड करत होता.
जागतिक बाजारातही घसरण -
जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. जागतिक बाजारात सोने गेल्या तीन महिन्यातील सर्वात खालच्या पातळीवर ट्रेड करत आहे. आज जागतिक बाजारात सोने 0.1 टक्यांच्या घसरणीसह 1,820.54 डॉलर प्रती औंसवर ट्रेड करत आहे. तर चांदीची स्पॉट किंमत 0.5 टक्क्यांनी घसरून 20.76 डॉलर प्रति औंसवर आली आहे.