Join us

Gold Silver Rate Today: सोन्याची झळाळी झाली कमी; चांदीच्या दरातही ₹३०६१ ची घसरण, पाहा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 2:43 PM

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाच्या दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर.

Gold Silver Price Today: अर्थसंकल्पाच्या दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज चांदी ३०६१ रुपयांनी घसरून ८१८०१ रुपये प्रति किलो झाली. सोन्याचा भाव ९७४ रुपयांनी घसरून ६८,१७७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मंगळवारी एका झटक्यात सोनं प्रति १० ग्रॅम ३६१६ रुपयांनी स्वस्त झालं होतं. चांदीच्या दरात मात्र प्रति किलो ३२७७ रुपयांची घसरण झाली. तीन दिवसांत सोनं जवळपास ५००० रुपयांनी स्वस्त झालं आहे, तर चांदी ६००० रुपयांपेक्षा जास्त घसरली आहे.

एमसीएक्सवर आज सकाळी सोन्याचा भाव १,१५९ रुपये म्हणजेच १.६८ टक्क्यांनी घसरून ६७,७९३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) चांदीचा भाव ३,३४३ रुपये म्हणजेच ३.९४ टक्क्यांनी घसरून ८१,५५१ रुपये प्रति किलो झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव ०.९ टक्क्यांनी घसरून २,३७७.२९ डॉलर प्रति औंस झाला, तर अमेरिकन सोन्याचा वायदा १.६ टक्क्यांनी घसरून २,३७६.७० डॉलर्स झाला.

आयबीजेएनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ६९१५१ रुपये प्रति १० ग्रॅमवरून ६८१७७ रुपये झाला आहे. तर २३ कॅरेट सोन्याचा भाव ६७९०४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ६२४५० रुपये तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ५११३३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ३९८८४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. चांदीच्या दरातही आज मोठी घसरण दिसून आलीये.

का झाली घसरण?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय भाषणात सोनx आणि चांदीवरील सीमा शुल्क १० टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली. त्याचा परिणाम सराफा बाजारावरही झाला. व्यापार तूट वाढल्यानंतर जुलै २०२२ मध्ये केंद्रानं सोन्यावरील सीमा शुल्कात वाढ केली होती. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारत सोन्याच्या आयातीवर अवलंबून असल्यानं सोन्याच्या वापरात वाढ झाल्यास त्याचा परिणाम व्यापार तुटीवर होतो. निर्यात वाढली नाही तर सरकारला पुन्हा सोन्यावरील सीमा शुल्क वाढवावं लागू शकते. भारत दरवर्षी ८०० ते ८५० टन सोने आयात करतो.

(टीप - हे दर आयबीजेएद्वारे जारी करण्यात आलेले आहेत. यावर जीएसटी आणि मेकिंग चार्जेस लावण्यात आलेले नाही. तुमच्या शहरात सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.)

टॅग्स :सोनंगुंतवणूक