संपूर्ण देशभरात दिवाळी उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. उद्या म्हणजेच शनिवारी धनत्रयोदशी आहे. या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. आपणही सोने अथवा चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. सध्या सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण बघायला मिळत आहे. आजही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली आहे. जागतिक बाजारात या मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाल्याने शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारातही सोन्याचा दर 372 रुपयांनी घसरून 50,139 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
799 रुपयांनी चांदी स्वस्त -
यापूर्वीच्या व्यापाराच्या सत्रात सोन्याचा दर 50,511 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भावही 799 रुपयांनी घसरून 56,089 रुपये प्रति किलोवर आला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो 56,888 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव घसरणीसह 1,621.25 डॉलर प्रति औंस, तर चांदीचा भावही 18.41 डॉलर प्रति औंसवर आला आहे.
काय म्हणतात तज्ज्ञ? -
एचडीएफसी सिक्योरिटीजचे विश्लेषक दिलीप परमार म्हणाले, डॉलर मजबूत झाल्याने कॉमेक्समध्ये स्पॉट गोल्ड सलग दुसऱ्या आठवड्यात घसरत आहे. एप्रिल 2020 पासून किंमत सर्वात खालच्या पातळीवर पोहोचली आहे.