Gold Silver Price Hike : सोन्या-चांदीच्या दरात जोरदार वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यानं दोन आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. दरम्यान, भारतीय वायदा बाजारातही चांगली तेजी दिसून येत आहे. सोन्याचे दर पुन्हा एकदा ७३,००० च्या वर गेले आहे. तर चांदीही पुन्हा ९४,००० च्या जवळ पोहोचली आहे.
भारतीय वायदा बाजारात शुक्रवारी (७ जून) सोन्याचा वायदा भाव २४३ रुपयांनी वधारून ७३,३७४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला, जो काल ७३,१३१ रुपयांवर बंद झाला. चांदी ४९५ रुपयांनी वधारून ९४,३११ रुपये प्रति किलो ग्रॅम झाली आहे. गुरुवारी चांदी ९३,८१६ रुपयांवर बंद झालं होतं.
कॉमेक्सवरील सोनं काल २० डॉलरनं वधारून २४०० डॉलरवर पोहोचलं आणि चांदीने १ वर्षातील सर्वात मोठी इंट्राडे वाढ नोंदविली. अमेरिकेतील नोकऱ्यांच्या कमकुवत आकडेवारीमुळे व्याजदरात कपातीच्या अपेक्षेला चालना मिळाल्यानं सोने दोन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलंय. स्पॉट गोल्ड ०.८ टक्क्यांनी वधारून २.३७३.९९ डॉलर प्रति औंस झाले. अमेरिकेतील सोन्याचा वायदा भावही ०.७ टक्क्यांनी वधारून २,३९३ डॉलर प्रति औंस झाला.
सराफा बाजारात सोनं महागलं
आंतरराष्ट्रीय बाजारातून चांगले संकेत मिळत असताना दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चांगली वाढ झाली आहे. गुरुवारी सोनं ६८० रुपयांनी तर चांदी १४०० रुपयांनी वधारली होती. सोनं ६८० रुपयांनी वधारून ७३,५०० रुपये प्रति १० ग्रॅम झालं. मागील सत्रात सोन्याचा भाव ७२,८२० रुपये प्रति १० ग्रॅम वर बंद झाला होता. चांदीचा भावही १,४०० रुपयांनी वधारून ९३,३०० रुपये प्रति किलो झाला. मागील सत्रात तो ९१,९०० रुपये प्रति किलोवर बंद झाला.