नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आयात शुल्क कपातीची घोषणा केल्यानतंर आता सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या चार दिवसांत सोन्याचा दर २ हजार रुपयांनी घसरल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे चांदीचा दरही कमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
आताच्या घडीला मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४७ हजार ५४९ रुपये आहे. त्याआधी सोने २०० रुपयांनी वधारून ४८ हजार ०४९ रुपयांपर्यंत गेले होते. चांदीचा भावातही घसरण झाली असून, एका किलो चांदीचा भाव ६८ हजार ३५६ रुपये झाला आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्यात आल्यानंतर सोने दरात घसरण झाली होती. सोने २२०० रुपयांनी स्वस्त झाले. सोने आणि चांदीमध्ये विक्रीचा सपाटा सुरू राहिल्यामुळे चांदीच्या दरात ३ हजार २८० रुपयांची घसरण झाली होती.
एका वेबसाईटनुसार, मुंबई २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८ हजार रुपये झाला आहे. पुण्यातही २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८ हजार रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४५ हजार ४१० रुपये असून, २४ कॅरेटचा भाव ४९ हजार ५४० रुपये आहे. तर, कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८ हजार ०७० रुपये असून, २४ कॅरेट सोन्याचा भाव ५० हजार ७७० रुपये आहे.