Join us

Gold Silver Price Today: सोन्याचा भाव गडगडला, चांदीनेही गाठली दोन वर्षांतील सर्वात नीचांकी पातळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 2:11 PM

डॉलरच्या तुलनेत रुपयाही सर्वकालीन नीचांकावर

Gold Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अमेरिकन बाजारातील घसरणीमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. आज भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. याचा परिणाम सोने चांदी बाजारवर झाल्याचे दिसून आले. सराफा बाजार आणि MCX या दोन्ही बाजारात मोठी घसरण झाली. सराफा बाजारात सोमवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण झाली. इंडिया बुलियन असोसिएशनने जारी केलेल्या दरानुसार, शुक्रवारच्या तुलनेत चांदीचा भाव प्रतिकिलो १ हजार ४०५ रुपयांनी घसरून ५४ हजार २०५ रुपयांवर आला. त्याचप्रमाणे २४ कॅरेट सोन्याचा भाव ४३७ रुपयांनी घसरून ५१ हजार २३१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यापूर्वी २६ जुलै रोजी चांदीचा दर ५४ हजार १५५ रुपये प्रति किलोवर गेला होता.

डॉलरच्या तुलनेत रुपयाही ८०.०८ रुपयांच्या नीचांकी पातळीवर उघडला. स्थानिक बाजारात, MCX वर दुपारी १२ वाजताच्या सुमारास सोने २९२ रुपयांच्या घसरणीसह ५० हजार ९४६ रुपये प्रति १० ग्रॅमवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड १ हजार ७२४ डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किमती अशाच राहण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

चांदी दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर- देशांतर्गत बाजारात चांदीच्या दरात ८३० रुपयांची घसरण दिसून आली आणि तो ५३ हजार ९५० रुपयांच्या पातळीवर आला. डिसेंबर डिलीवरी वाल्या चांदीचा भाव ९१० रुपयांनी घसरून ५४ हजार ८६० रुपयांवर आला. IIFL सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांनी सांगितले की, सोमवारी चांदी ५३ हजार ७८५ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली. ही दोन वर्षांतील सर्वात नीचांकी पातळी आहे.

रुपया सर्वकालीन नीचांकावर- डॉलरच्या तुलनेत रुपया २१ पैशांच्या घसरणीसह ८०.०८ वर उघडला. शुक्रवारी तो ७९.८७ च्या पातळीवर बंद झाला होता. आजच्या व्यवहारा दरम्यान रुपया ८०.१३ च्या पातळीवर घसरला. ही विक्रमी नीचांकी पातळी आहे. अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, ही रुपयाची सर्वकालीन नीचांका पातळी आहे. त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. अल्पावधीत, डॉलरच्या तुलनेत रुपया ८१.५० च्या पातळीवर घसरण्याची अपेक्षा आहे.

सेन्सेक्समध्ये १,४६६ अंकांची घसरण- आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मंदी दिसून आली. सोमवारी सकाळी १ हजार ४६६ अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स ५७ हजार ३६७ च्या पातळीवर उघडला. निफ्टी ३७० अंकांच्या घसरणीसह १७ हजार १८८ च्या पातळीवर उघडला. मात्र, त्यानंतर बाजारात रिकव्हरीचे वातावरण पाहायला मिळत आहे, त्यामुळे बाजार बंद होताना या काही प्रमाणात दिलासादायक स्थिती पाहायला मिळू शकते.

टॅग्स :सोनंचांदीशेअर बाजार