जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली, याचा परिणाम भारतीय बाजारातही दिसून आला. सोन्याचा दर एक वर्षाच्या निच्चांकावर गेला आहे. चांदीच्या दरातही ४०० रुपयांहून अधिक घसरण झाली आहे.
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट सोन्याचा दर सकाळी बाजार उघडताच २५० रुपयांनी कोसळला, तो 49,958 रुपये प्रति ग्रॅमवर आला. ५० हजारावर सुरु झालेला वायदा बाजार जागतिक पडझडीमुळे पन्नास हजाराच्या खाली आला. ही गेल्या पाच महिन्यांतील पहिल्यांदाच झालेली पन्नास हजाराच्या खालील घसरण आहे. सध्या सोने 247 घसरून 49978 वर व्यापार करत आहे.
सोन्यासारखीच आज चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीच्या दरात ४८० रुपयांची घसरण दिसून आली. चांदीचा दर 55,130 रुपये प्रति किलोवर आला आहे. सकाळी चांदी 55,450 रुपये प्रति किलोवर होती, मात्र जागतिक बाजारातील दबाव चांदीच्या किंमतीवर दिसून आला.
जागतिक बाजारात सोन्या चांदीच्या दरात घट झाली आहे. हे दर जवळपास एक वर्षाच्या निचांकावर गेले आहेत. अमेरिकी बाजारात सोन्याचा दर 1,691.40 डॉलर प्रति औंस आहे, जो ऑगस्ट २०२१ नंतरचा सर्वात कमी आहे.
डॉलरचा भाव वधारल्याने गुंतवणूकदार तिथे पैसा गुंतवू लागले आहेत, यामुळे ते सोन्या, चांदीतून पैसे काढून घेऊ लागले आहेत. भारतीय बाजारात सोन्यावर आयात शुल्क वाढविल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे. मागणी कमी झाल्याने देखील भारतात सोन्याच्या दरात घट होऊ लागली आहे. हा दबाव जागतिक बाजारात पुन्हा तेजी येईस्तोवर सुरु राहणार आहे.