Join us  

दुबई, सिंगापूरमधून सोन्याची तस्करी!

By admin | Published: October 11, 2015 10:24 PM

भारतात पुन्हा एकदा सोन्याच्या तस्करीचे दिवस आले आहेत. सोन्याची वाढती मागणी आणि किमतीतील तफावत यामुळे दुबई आणि सिंगापूर येथून भारतात सोन्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे.

चेन्नई : भारतात पुन्हा एकदा सोन्याच्या तस्करीचे दिवस आले आहेत. सोन्याची वाढती मागणी आणि किमतीतील तफावत यामुळे दुबई आणि सिंगापूर येथून भारतात सोन्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. महसुली गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) तपासात ही माहिती समोर आली आहे. सोन्याच्या तस्करीमध्ये काही टोळ्या सक्रिय असल्याचे गुप्तचारांची माहिती आहे.जुन्या हिंदी चित्रपटांतील खलनायक सोन्याची तस्करी करताना दाखविले जात असत. हे दिवस पुन्हा एकदा आले आहेत, असे दिसून येते. चोरट्या मार्गाने सोने आणणारे तस्कर थेट विमानाने प्रवास करतात. त्यांचा अवतार सामान्य नागरिकांसारखा असतो. विदेशातून सोबत आणण्यात येणाऱ्या विविध वस्तंूमध्ये लपवून सोने आणले जाते. तसेच सागरी मार्गानेही सोन्याची तस्करी होते. या तस्करीवर संपूर्णपणे अंकुश लावणे अशक्य असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. डीआरआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अलीकडे दक्षिण भारतातील अनेक शहरांत तस्करीचे कित्येक किलो सोने पकडण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात तामिळनाडूतील मदुराई विमानतळावर ८.४३ कोटींचे ३१.७५ किलो सोने पकडण्यात आले होते. भारतात सोन्याची किंमत अधिक आहे. तसेच मागणीही मोठी आहे. त्यामुळे दुबई आणि सिंगापूरसारख्या ठिकाणांहून सोने खरेदी करून भारतात विकणे तस्करांसाठी किफायतशीर ठरत आहे. सोन्यावरील आयात शुल्क वाढवून १0 टक्के करण्यात आले आहे. तसेच सोन्याच्या खरेदीवरही जाचक अटी आल्या आहेत. त्यामुळे सोन्याची तस्करी आकर्षक पर्याय ठरला आहे.विदेशात गेलेल्या कोणत्याही नागरिकाने भारतात परतताना सोबत सोने आणल्यास त्याची घोषणा विमानतळावर करावी लागते. त्यावर १0 टक्के कर लावला जातो. हा कर विदेशी चलनात अदा करावा लागतो. एक किलो सोन्यावरील आयात कर सुमारे सव्वादोन लाख रुपये होतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)