Join us  

लग्नसराईमुळे सोने तेजीत, सोने प्रतितोळा ६३,८२० रुपये, चांदी प्रतिकिलो ७९,५०० रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 9:37 AM

Gold-Silver Price: लग्नसराईच्या हंगामामुळे सोन्याची किंमत मागील आठवड्यापासून विक्रमी उंचीवर आहे. शुक्रवारीही सोन्याच्या किमतीतील तेजी कायम राहिली. मुंबई आणि चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,८२० रुपये प्रतितोळा इतका होता.

नवी दिल्ली - लग्नसराईच्या हंगामामुळे सोन्याची किंमत मागील आठवड्यापासून विक्रमी उंचीवर आहे. शुक्रवारीही सोन्याच्या किमतीतील तेजी कायम राहिली. मुंबई आणि चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,८२० रुपये प्रतितोळा इतका होता, तर दिल्ली एनसीआरमध्ये हाच दर ६१,१०० रुपयांच्या आसपास होता. चांदीचा दर प्रतिकिलो ७९,५०० रुपये इतका दिसून आला.  लग्नसराईत मागणी मोठ्या प्रमाणाात वाढत असल्याने मौल्यवान धातूंच्या किमतीत तेजी कायम राहण्याची चिन्हे आहेत. 

कसा ठरतो सोन्याचे दर? सोन्याचा दर बऱ्याच अंशी बाजारातील मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असतो. सोन्याची मागणी वाढताच दर वाढताे. सोन्याचा पुरवठा चांगला असेल तर दर खाली येताे.जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थितीचाही सोन्याच्या दरावर परिणाम होतो. जागतिक अर्थव्यवस्थेची गती कमी असते तेव्हा सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. त्यामुळे सोन्याची किंमत वाढते. 

जागतिक बाजारातही सोने-चांदीला तेजीशुक्रवारी जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून आले. अमेरिकेच्या धातू व्यापारासाठी मान्यताप्राप्त एक्सचेंज कॉमेक्समध्ये सोन्याचा वायदा भाव ०.१० टक्के अर्थात २.१० डॉलर्सने वाढून २०५९.३० डॉलर्स प्रति औस इतका होता, तर सोन्याच्या सध्याचा भाव ०.१८ टक्के म्हणजेच ३.७३ डॉलर्सने वाढून २०४०.१४ डॉलर्स प्रतिऔस इतका होता.चांदीच्या जागतिक बाजारात शुक्रवारी तेजी दिसून आली. कॉमेक्स एक्सचेंजमध्ये चांदीचा वायदा भाव ०.२१ टक्के म्हणजे ०.०६ डॉलर्सने वाढून २५.७२ डॉलर्स प्रतिऔस इतका होता, तर सध्याचा भाव ०.१३ टक्के म्हणजेच ०.०३ डॉलर्सने वाढून २५.३० डॉलर्स प्रतिऔस इतका दिसून आला.

टॅग्स :सोनंचांदीव्यवसाय