Join us

स्वस्त झालेले सोने पुन्हा होणार महाग? जीएसटीत वाढ होण्याची बाजारात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 8:17 AM

लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर लोकही आतापासून सोने-चांदीचे दागिने घेण्यासाठी सुरुवात करीत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात घट करण्यात आली. आधी १५ टक्के इतके असलेले शुल्क ६ टक्के करण्यात आल्याने ग्राहक तसेच ज्वेलर्सनाही मोठा लाभ झाला. परिणामी २३ जुलैनंतर आतापर्यंत सोन्याचे दर आतापर्यंत सोन्याचे दर ९ टक्के घसरले आहेत. असे असतानाच सरकारकडून सोने आणि चांदीवरजीएसटीमध्ये वाढ केली जाईल, अशी चर्चा आहे. लहान व्यापाऱ्यांना ही वाढ होईल, याची चिंता सतावत आहे. जाणकारांच्या मते अशा वाढीची शक्यता नसून ज्वेलर्स विक्री वाढवण्यासाठी अशी चर्चा करीत असावेत. 

सध्या चीनमध्ये सोन्याची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर सातत्याने घटत आहेत. परंतु जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतात मात्र विक्रीने जोर धरला आहे. लोकांना फायदा होत आहे. सराफा बाजारातही ग्राहकांना सोन्याची खरेदी आताच करा, असे आवाहन केले जात आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर लोकही आतापासून सोने-चांदीचे दागिने घेण्यासाठी सुरुवात करीत आहेत. 

नाण्यांनाच जोरदार मागणी 

सध्या ग्राहकांचा भर सोने-चांदीची नाणी खरेदी करण्यावर आहे. नाणी घडणावळीवर फारसे शुल्क लागत नसल्याने शुल्कात घट केल्याचा थेट लाभ ग्राहकांना मिळत आहे.  परंतु सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केल्यास शुल्ककपातीचा तितका लाभ ग्राहकांना मिळत नाही. कारण दागिन्यांच्या घडणावळीपोठी काही शुल्क त्यांना भरावे लागते.  

टॅग्स :सोनंचांदीजीएसटी