Join us  

कोरोनाची लस लागू झाल्यावर सोन्याचा दर किती असणार?; जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 1:36 AM

कोरोनामुळे मुंबईच्या सराफा बाजाराला मोठा फटका

- सचिन लुंगसेमुंबई : कोरोनाची लस आली, तर लोकांमध्ये सुरक्षित भावना निर्माण होईल. लोकांमध्ये सुरक्षित भावना आली, तर त्यांच्यामध्ये घराबाहेर पडून काम करण्याचा आत्मविश्वास वाढेल. कारण आजही बहुतांशी बाजारपेठांमध्ये सुधार झालेला नाही. जर कोरोनाची लस आली. लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली, तर कामासाठी घराबाहेर पडलेल्या लोकांमुळे अर्थव्यवस्था रुळावर येईल. परिणामी, अर्थव्यवस्था रुळावर आली, तर सोन्याचा भाव ४५ ते ५० हजारांवर दरम्यान राहील, असा दावा सराफांनी केला आहे. कोरोनामुळे सोन्याचा भाव ४० हजारांहून ५८ हजारांवर दाखल झाला होता, अशी माहिती मुंबईच्या दागिना बाजारातील सराफांनी दिली.कोरोनामुळे सोन्याच्या भावात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत आहे. जगभरातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. अमेरिका सरकारच्या फेडरल रिझर्व्ह बँकचे असे म्हणणे आहे की, २०२३ पर्यंत त्यांच्याकडून व्याजाच्या दरात वाढ केली जाणार नाही. अमेरिकेची बाजारपेठ सर्वात मोठी बाजारपेठ ओळखली जाते. लोकांना जर या बाजारपेठेतून व्याज मिळाले नाही, तर लोक बँकेतील पैसा सोन्यात गुंतवतील. त्यामुळे सोन्यात तेजी येतच राहणार. आता सोन्याचा भाव प्रतितोळा ५० हजारांच्या आसपास आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत हा भाव प्रतितोळा ८० हजार होण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस अजून बाजारात दाखल झालेली नाही. जेव्हा ही लस बाजारात दाखल होईल, लस लागू होईल, यास किमान २०२१ उजाडेल. त्यामुळे तोवर सोने तेजीत राहील. कोरोनाची लस आली की, सोन्याची बाजारपेठ ४५ आणि ५० हजारांदरम्यान राहील.कोरोनामुळे मुंबईच्या सराफ बाजाराला मोठा फटका बसला आहे. गेल्या ९ महिन्यांपासून लोकांनी काम केलेले नाही. झवेरी बाजारात ५ ते ७ लाख कारगीर होते. काही गावी गेले. त्यांना तेथेही काम नव्हते. आता ते परत येत आहेत. ५० टक्के कारगीर परत आले आहेत. झवेरी बाजारात ३ हजार शॉप्स आहेत. कारखाने आणि कार्यालय ३५ हजार आहेत. हे सगळे सोन्याशी निगडित आहेत. कोरोनानंतर आता मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे होत आहेत. गेल्या वर्षी ६७ मुहूर्त होते. भविष्यात १०३ ते १०४ मुहूर्त आहेत. विवाह सोहळ्यांमुळे सोन्यात तेजी राहील. सोन्याला मागणी राहील. डिसेंबरमध्ये ५० हजार रुपये प्रतितोळा असलेल्या भावात याच महिन्यात किंवा जानेवारी महिन्यात ५ ते ७ हजारांची वाढ होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात एका दिवसाला देशभरात १ लाख ५२ हजार विवाह झाले होते. आता आणखी मुहूर्त असल्याने सोने तेजीत राहण्याची शक्यता आहे.- कुमार जैन, उपाध्यक्ष, मुंबई ज्वेलर्स असोसिएशन 

टॅग्स :सोनंकोरोना वायरस बातम्या