डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक
सोने एक अमूल्य धातू... यात दडली आहे गुंतवणूक आणि हौससुद्धा. या वर्षात सोन्याने त्याच्या भावात नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. भारतात सोन्याचा भाव प्रतितोळा जवळजवळ रुपये ८० हजारांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. प्रत्येक वर्षी भाव वाढत असतानासुद्धा सोन्याची मागणी ही कमी न होता वाढतानाच दिसते.
हौसेला मोल नाही
भारतात स्त्रियांना दागिने आवडत नाहीत अशा फार कमी स्त्रिया आढळतील. अंगावर सोने असावे आणि तेच सोने स्त्रीधन म्हणून स्वतःकडे आणि कुटुंबात येणाऱ्या पिढीकडे असावे असा विचार अनेक कुटुंबांत केला जातो. विविध प्रकारचे दागिने स्त्रियांना सोने खरेदी करण्यासाठी आकृष्ट करत असतात.
साेन्यात दडलेली असते एक हौस आणि घरातील अर्थसत्ता.
आपण म्हणतो हौसेला मोल नसते, याचाच अर्थ हौस भागवण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात आणि ते करताना सढळ हस्ते केलेही जातात. सोन्याची हौस पूर्ण करताना पैसे तर खर्च होतातच; परंतु या हौसेला मोल नाही असे म्हणता येणार नाही. कारण सोने अमूल्य आहे.
साेने अमूल्य असा धातू आहे. याचे उत्पादन मर्यादित स्वरूपात असल्याने आणि मागणी अधिक स्वरूपात असल्याने भाव वाढतच राहतात. हौसेने म्हणून घेतलेल्या सोन्याने भविष्यात उत्तम परतावा दिल्याचे सिद्ध झाले आहे आणि होत आहे.
५० वर्षांत सोन्याचा भाव १६० पट
१९७४ साली सोन्याचा भाव प्रतितोळा साधारण पाचशे रुपये होता. २०२४ मध्ये हाच भाव ८० हजार रुपये तोळा येथपर्यंत वाढला. म्हणजेच प्रतितोळा तब्बल १६० पटींनी भाव वाढला. याचाच अर्थ ५० वर्षांत पाचशे रुपयांचे ८० हजार रुपये झाले.
पिवळ्या धातूचे जागतिक महत्त्व...
जागतिक पातळीवर प्रत्येक देश सोन्याकडे आपत्कालीन अर्थसाठा म्हणून पाहतो. जसे कुटुंबात आवश्यक वेळी सोने गहाण ठेवले जाते किंवा विकून पैसे उभे केले जातात, त्यानुसार देशाला जर आर्थिक निकड किंवा पैशांची आवश्यकता भासल्यास हेच सोने त्यांच्या कामी येते. अनेकदा अनेक देशांनी त्यांच्याकडील सोने गहाण ठेवून किंवा विकून पैसे उभे केल्याची उदाहरणे आहेतच. याचमुळे जागतिक पातळीवर सोन्याचे महत्त्व पूर्वीपासून होते, आहे आणि भविष्यात राहणारच आहे.
वाढीव भावात सोन्यात गुंतवणूक योग्य ठरेल का?
सोन्यात गुंतवणूक करताना त्याचा भाव पाहूच नये. कारण प्रत्येक वर्षी हाच प्रश्न पडेल की भाव वाढले आहेत आता घेऊ की वाट पाहू. दीर्घकाळासाठी सोन्यातील गुंतवणूक ही नेहमी फायद्याची ठरते. ज्यांनी गेल्या अनेक वर्षांत गुंज गुंज सोने घेतले आहे ते आज नक्कीच श्रीमंत झाले आहेत. त्यामुळे सोन्याला भविष्यात कायमच सोन्याचे दिवस राहतील याच शंका नाही.