Join us

सोन्याची दिवाळी! धनत्रयोदशीला विकले गेले साडेसात हजार कोटींचे सोने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 8:56 AM

दिवाळीचा उत्साह : दोन वर्षांत प्रथमच १५ टन सोन्याची खरेदी; कमी किमतीचा झाला लाभ

मुंबई : यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी देशात विक्रमी सोने विक्री झाली आहे. दोन वर्षांत यंदा पहिल्यांदाच १५ टन सोने विकले गेले असून, त्याची किंमत ७.५ हजार कोटी रुपये आहे. 

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून देशातील सोने व्यापारी मंदीचे फटके सहन करीत होते. कोरोनाचा विळखा शिथिल होताच यंदा लोकांनी जोरदार साेने खरेदी केली आहे. मंगळवारी झालेल्या धनतेरसच्या दिवशी मुंबई, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद अशा मोठ्या शहरांतील सोन्याच्या दुकानांत जबरदस्त गर्दी पाहायला मिळाली. ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (कैट) ने म्हटले की, देशात धनतेरसला १५  टन सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली. दिल्लीत १ हजार कोटी रुपयांचा व्यापार झाला. दक्षिण भारतात २ हजार कोटी रुपयांचा व्यापार झाला. 

काही व्यापाऱ्यांच्या मते, यंदा सोने तुलनेने स्वस्त राहिले.  २०१९ आणि २०२० मध्ये सोन्याच्या किमतीत तेजीने वाढ झाली होती. यंदा मात्र किमती स्थिर आहेत. बंगळुरूमधील प्रसिद्ध सोने विक्रेते चेट्टी ग्रुप ऑफ ज्वेलर्सने म्हटले की, धनतेरसच्या दिवशी सोने खरेदीत ६५ टक्के वाढ दिसून आली. यंदा दागिन्यांच्या उत्पादनापेक्षा जास्त विक्री झाली आहे. त्यामुळे आम्ही साठाही ठेवू शकलेलो नाही. कोरोनामुळे उत्पादनास उशीर होत आहे. गेल्या वर्षीपेक्षा दर कमी असल्याने सोन्याची खरेदी यंदा अधिक होईल, असा अंदाज सराफांनी सुरुवातीपासून व्यक्त केला होता. तसेच आर्थिक अस्थिरतेमुळे सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदीला प्राधान्य देण्यात आले.  धनत्रयोदशीच्या दिवशी तशी गर्दी दिसून आली. 

लग्नसराईमुळे खरेदीमध्ये झाली वाढधनतेरसच्या दिवशी सोन्या-चांदीचे शिक्के खरेदी करणे शुभ समजले जाते. त्यामुळे यादिवशी सोन्या-चांदीची मोठी विक्री होते. लग्नसराई सुरू होत असल्यामुळे लोकांनी मुहूर्तावर दागिन्यांचीही खरेदी केली. २०२१ च्या पहिल्या सहामाहीत ७०० टन सोन्याची आयात करण्यात आली होती. 

मंगळवारी मौल्यवान धातूंचे दर आले खालीनवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोने व चांदीच्या दरामध्ये घट झाल्यामुळे देशांतर्गत बाजार पेठेतही दर घटले. येथील सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात १० ग्रॅमला ३७५ रुपयांनी घट होऊन दर ४६,६११ रुपयांवर बंद झाले. चांदीच्या दरामध्ये ८९८ रुपये प्रति किलो अशी घट झाली. बाजार बंद होताना चांदीचा दर किलोला ६२,०५२ रुपया असा होता.

टॅग्स :सोनंदिवाळी 2021