हैदराबाद : अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ युद्धात कोण विजयी होईल, हे अनिश्चित असले तरी या धामधुमीत सोने निर्विवादपणे जिंकले असल्याचे वास्तव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सोने या सप्ताहात प्रथमच ३,३०० डॉलर प्रतिऔंस झाले. तसेच भारतातही प्रती १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख रुपयांच्या उंबरठ्यावर आला.
टॅरिफ युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या गर्तेत गेल्यामुळे सोने हे गुंतवणुकीचे सुरक्षित साधन म्हणून पुढे आले आहे. त्यामुळे सोन्याचा भाव सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला.
आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सोने बुधवारी प्रथमच ३,३०० डॉलरचा टप्पा ओलांडून ३,३१८ डॉलर प्रतिऔंस झाले.
भारतातही सोन्याने प्रथमच ९८ हजारांचा टप्पा ओलांडला. १० ग्रॅम सोन्याचा भाव त्या दिवशी ९८,१०० रुपये प्रती १० ग्रॅम झाला. वायदेबाजारातही सोन्याने नवा उच्चांक निर्माण केला आहे.
नफा वसुलीला ऊत
सोन्याच्या भावात अचानक मोठी वाढ झाल्यामुळे बाजारात खरेदीदारांपेक्षा सोने विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ही अभूतपूर्व स्थिती आहे. अनेकजण नफावसुलीसाठी सोने विकत आहेत.
- १९२.१३% सोने आयात मार्चमध्ये वाढली. ही किंमत ४.४७ अब्ज डॉलर.
- ३३३१ डॉलर प्रतिऔंस या उच्चांकावर पोहोचली सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत
- ३३ डॉलर प्रतिऔंस या किमतीवर पोहोचली चांदी.
- १५ % पेक्षा अधिक चांदीची ४ महिन्यांत किंमतवाढ.
- १२ % गोल्ड इटीएफमध्ये गुंतवणूक वाढली.
सोन्याची किंमत का वाढली?
अमेरिका चीन यांच्यातील टॅरिफ युद्ध. केंद्रीय बँकांकडून सुरू असलेली खरेदी. अमेरिकेचा डॉलर कमकुवत, जागतिक राजकारणात चिंता. गुंतवणुकीला संधी म्हणून सोन्यात गुंतवणूक.
८ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने २,९८२ डॉलर प्रतिऔंस होते. त्यानंतरच्या आठ दिवसांत सोने ११ टक्के महाग झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाच्या खनिजांच्या चौकशीचे आदेश जारी केल्यामुळे सोने ‘सेफ हेवन ॲसेट’ म्हणून पुढे आले आहे.
सोन्याची किंमत किती कुठे? (१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत रुपयात)
मुंबई - ९८,६००
नवी दिल्ली - ९८,१००
इंदूर - ९७,०००
जयपूर -९७,१००