Anil Ambani Company : गेल्या काही दिवसांपासून उद्योगपती अनिल अंबानी यांचं चर्चेत आलं आहे. एकेकाळी कर्जात बुडालेले अंबानी आता त्यातून बाहेर पडत असून चांगला व्यवसाय करत आहे. मात्र, उद्योगपती अनिल अंबानी यांचे अच्छे दिन फार काळ टिकत नसल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांवरुन दिसत आहे. चांगली बातमी आली नाही की लगेच एखादं संकट दार ठोठावते. अलीकडे अनिल अंबानींच्या कंपन्यांची कामगिरी चांगली होऊ लागली आहे. कंपन्या कर्जमुक्त होताच त्यांना नवीन ऑर्डर मिळू लागल्या आहेत. रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रा यांचे शेअर्स पुन्हा सक्रीय झालेत. मात्र, आता एकाच वेळी अंबानी यांना चांगली आणि वाईट बातमी आली आहे.
अनिल अंबानींसाठी गुड न्यूज
अनिल अंबानींच्या प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल सांगायचे तर, चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीने ४०८२ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २९४.०४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या आर्थिक स्टेटमेन्टने कर्जाचा बोजा उतरवला आहे. तसेच, त्यांना एका लवाद प्रकरणात ८०.९७ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे त्याचा नफा वाढला आहे. रिलायन्स पॉवरने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत २८७८.१५ कोटी रुपयांचा नफा कमावला, जो आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या त्याच तिमाहीत २३७.७६ कोटी रुपयांचा तोटा होता. कंपन्यांचे कर्ज कमी होऊन नफा वाढल्याने त्यांना नवीन ऑर्डर मिळू लागल्या आहेत. त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स वेगाने वाढू लागले आहेत.
अनिल अंबानींसाठी वाईट बातमी
सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SECI) ने रिलायन्स पॉवरला नोटीस पाठवून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई का सुरू करू नये, अशी विचारणा केली आहे. बनावट बँक कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपावरून SECI ने रिलायन्स पॉवरवर पुढील ३ वर्षांसाठी बंदी घातली आहे. अनिल अंबानींच्या कंपन्या SEBI आणि SECI च्या रडारवर आल्या आहेत. बाजार नियामक सेबीने त्यांना व्यापार करण्यास बंदी घातली आहे. त्याचवेळी, सरकारी कंपनी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) ने रिलायन्स पॉवरला बोली लावण्यापासून थांबवले आहे.
अलीकडेच त्यांच्यावर कर्जाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. कॅनरा बँकेने अनिल अंबानींची रिलायन्स कंपनी आणि तिच्या उपकंपनीला फसवी खाती म्हणून वर्गीकृत केले आहे. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड फंड गैरव्यवहार प्रकरणात सेबीने रिलायन्स बिग एंटरटेनमेंटला २६ कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. यापूर्वी रिलायन्स एंटरटेनमेंटलाही दंड ठोठावण्यात आला होता.