नवी दिल्ली - मागील तीन वर्षांत देशात क्रेडिट कार्डद्वारे होणारा खर्च तिप्पट वाढून १८ लाख कोटी रुपये झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
मार्च २०२४ला संपलेल्या वित्त वर्षात क्रेडिट कार्डांचे व्यवहार १८.३१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. ३ वर्षांपूर्वी मार्च २०२१ मध्ये ते ६.३० लाख कोटी रुपये होते. भारतीय अर्थव्यवस्था आता कोविड साथीच्या समस्यांतून बाहेर आली आहे. ग्राहकांचा विश्वास सातत्याने वाढत असल्याचे वाढत्या खर्चावरून दिसून येत आहे. क्रेडिट कार्डांची संख्या देशात सातत्याने वाढताना दिसून येत आहे. कार्डावरील खरेदीसाठी ठरावीक कालावधी व्याजमुक्त असतो. या मुदतीत पैसे भरल्यास ग्राहकांना व्याज द्यावे लागत नाही. मुदतीनंतर व्याज भरावे लागते.
थकबाकीही वाढतेय
कार्डांच्या व्यवहारांत वाढ झाली तशी त्यावरील कर्जाची थकबाकीही वाढली आहे. मार्च २०२४ मध्ये ही थकबाकी २,६७,९७९ कोटी रुपये होती. २०२२ मध्ये ती १,६१,५१२ कोटी होती.
असा वाढला खर्च
२०२०-२१ ६.३० लाख कोटी रुपये
२०२१-२२ ९.७१ लाख कोटी रुपये
२०२२-२३ १४.३२ लाख कोटी रुपये
२०२३-२४ १८.३१ लाख कोटी रुपये