Join us

Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:17 AM

Gautam Adani Group Share Price : अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्ससाठी मंगळवारचा दिवस चांगला होता. समूहातील लिस्डेट कंपन्यांचे शेअर्स दोन ते सहा टक्क्यांनी वधारले.

अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्ससाठी मंगळवारचा दिवस चांगला होता. समूहातील लिस्डेट कंपन्यांचे शेअर्स दोन ते सहा टक्क्यांनी वधारले. यामुळे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत ४.२२ अब्ज डॉलरची वाढ झाली. मंगळवारी ते कमाईत आघाडीवर होते.  

ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्सनुसार अदानी यांची नेटवर्थ आता ९९.१ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत ते १५ व्या स्थानावर आहेत. त्यांच्या संपत्तीत यंदा १४.८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) १०९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत ११ व्या क्रमांकावर आहेत. मंगळवारी त्यांच्या संपत्तीत १.५८ अब्ज डॉलरची वाढ झाली. या वर्षी त्यांच्या संपत्तीत १२.४ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. अशा प्रकारे दोघांच्या नेटवर्थमधील तफावत १० अब्ज डॉलरपेक्षा ही कमी आहे. 

मंगळवारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ 

मंगळवारी अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक वधारले. समूहाचे शेअर्स २ ते ६ टक्क्यांनी वधारले. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर आणि अदानी टोटल गॅसचे शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक वधारले. "बाजारातील तेजीनंतर अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये तेजी दिसून आली, कारण विद्यमान सरकारला मोठं बहुमत मिळेल, असा दावा केला जात आहे. भाजपच्या सत्तेत पुनरागमनाचा सर्वाधिक फायदा अदानी समूहाला होण्याची शक्यता आहे," अशी प्रतिक्रिया सॅमको सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अपूर्व शेठ यांनी दिली, 

एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केला होता. यामुळे शेअर बाजारात तेजी आली. ऊर्जा आणि कमॉडिटी शेअर्समधील तेजीचा परिणाम मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्सवरही झाल्याचंही शेठ म्हणाले. 

का आली तेजी? 

विद्यमान सरकार कायम राहिलं तर इन्फ्राला चालना मिळेल आणि सर्वात मोठी कंपनी असल्यानं अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. अदानींच्या अनेक कंपन्या पायाभूत सुविधांमध्ये आहेत. रिन्यूएबल, पॉवर, पॉवर ट्रान्समिशन, रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि बंदर क्षेत्रात या ग्रुपच्या कंपन्या काम करत असल्याची प्रतिक्रिया डीआर चोकसी फिनसर्व्हचे एमडी देवेन चोकसी यांनी दिली. अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चनं गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अदानी समूहाविषयी नकारात्मक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यामुळे गेल्या वर्षी अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. पण त्यानंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात रिकव्हरी दिसून येत आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीशेअर बाजारअदानी