देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं चौथ्या तिमाहीत जोरदार नफा कमावला आहे. या कालावधीत या बँकेच्या स्टँडअलोन 83 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च तिमाहीत स्टेट बँकेचा नफा 16,695 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी याच तिमाहीत एसबीआयचा नफा 9,113 कोटी रुपये होता.
जबरदस्त तिमाही निकालांनंतर, देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनंही आपल्या शेअरहोल्डर्सना एक चांगली बातमी दिली आहे. बँकेनं प्रति इक्विटी शेअर 11.30 रुपये लाभांश जाहीर केला आहे. गुंतवणूकदारांना 14 जून रोजी लाभांशाची रक्कम मिळणार आहे.
नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं
चौथ्या तिमाहीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निव्वळ व्याज उत्पन्नातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. या कालावधीत बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं चौथ्या तिमाहीत व्याजातून 40,993 कोटी रुपये कमावले आहेत. यापूर्वी, मागील वर्षी याच तिमाहीत बँकेने व्याजातून सुमारे 31,198 कोटी रुपये कमावले होते.
बँकांचे उत्तम तिमाही निकाल
एकीकडे अमेरिकेतील बँका बुडत आहेत. बँकिंग क्षेत्र मंदीच्या उंबरठ्यावर आले आहे. त्याच वेळी, चौथ्या तिमाहीत भारतीय बँकांनी चमकदार कामगिरी केली आहे. सरकारी बँक असो की खाजगी, सर्वांचे निकाल या काळात उत्कृष्ट लागले आहेत. चौथ्या तिमाहीत बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यासह बहुतांश बँकांचा नफा उत्कृष्ट राहिला आहे.