प्रसाद जोशी
भाजपाचे सरकार अधिकारावर आल्यापासून काही काळ तेजीत राहिलेल्या शेअर बाजाराला बुधवारी संपणारे संवत्सर हे फारसे लाभदायक ठरलेले नाही. या वर्षात बाजाराचा निर्देशांक ४ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. सत्तेवर येताना भाजपाने दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न पहिल्या वर्षात बाजारात काहीसे साकार झाले असले तरी, दुसऱ्या वर्षी मात्र निराशाच झाली आहे. आगामी वर्षात बाजाराला पुन्हा तेजीचे दिवस येण्याचे संकेत मात्र निश्चितच आहेत.
बिहारमधील निवडणुकीचे निकाल भाजपाच्या विरोधात गेल्यानंतर बाजार खाली येणार हे निश्चितच होते. त्याचाच प्रत्यय गेले दोन दिवस आला. संवत्सराचा शेवट मात्र नकारात्मक वातावरणात झाला.
विक्रम संवत २0७१चा प्रारंभ तेजीने झाला होता. मुहूर्ताच्या ट्रेडिंगला निर्देशांक वाढून २६८१५.0५ अंशांवर बंद झाला होता. या वर्षभरात निर्देशांकामध्ये १0७१.७९ अंशांची घट झाली आहे. याचाच अर्थ वर्षभरात निर्देशांक ४.१ टक्क्यांनी खाली आला. निफ्टीमध्येही वर्षभरात २३१.२0 अंशांची घट नोंदविली गेली आहे. या आधीच्या वर्षात (विक्रम संवत २0७0) मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ५५५५.८७ अंशांनी वाढला होता. १0 मार्च २0१४ रोजी निर्देशांक २२ हजार अंशांवर पोहोचला. तर १६ मे २0१४ रोजी निर्देशाकाने २५ हजार अंशांना स्पर्श केला. मात्र हा टप्पा बाजार बंद होईपर्यंत राखता आला नव्हता. ५ जून २0१४ रोजी बाजाराचा बंद निर्देशांक २५ हजाराच्या वर होता.
या वर्षभरात बाजाराला चीनमधील अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये झालेली घट, डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरत असलेले रुपयाचे मूल्य त्याचबरोबर परकीय वित्तसंस्थांकडून बराच काळ झालेली विक्री याचा फटका बसला. कागदोपत्री महामागाईचा दर कमी झालेला दिसत असला तरी, सर्वसामान्य नागरिकांना मात्र महागाईचा जबर फटका बसताना दिसत आहे. परिणामी अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागत असल्याने बचतीच्या प्रमाणात घट होत असून त्याचा फटकाही औद्योगिक क्षेत्रासह बाजाराला बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरात काही प्रमाणात घट झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळाली.
देशाच्या आयात-निर्यात प्रमाणातील तूट कमी झाली. तसेच चालू खात्यावरील तूटही कमी झाल्याने बाजाराला याचा फायदाच झाला. असे असले तरी केंद्रातील सरकारला आर्थिक सुधारणांचा वेग कायम राखण्यात अपयश येत असल्याने, तसेच काही महत्त्वाची विधेयके मंजुरीअभावी रखडल्याने बाजारात निरुत्साहाचे वातावरण राहिले. असे असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ७ टक्क्यांहून अधिक राहण्याची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, तसेच अन्य पतमापन संस्थांनीही असेच मत व्यक्त केले असल्याने आगामी वर्षामध्ये भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहून गुंतवणुकदारांना चांगला फायदा होण्याची शक्यता दिसत आहे. देशातील उत्पादन क्षेत्र त्याचप्रमाणे शेतीमध्ये किती प्रमाणात वाढ नोंदविली जाते. यावरच बाजाराच्या विकासाचा वेग अवलंबून राहणार आहे.
२४ आॅगस्ट रोजी मुंबई शेअर बाजारात १६00 अंशांची मोठी घसरण झाल्याने आणखी एका ब्लॅक मंडेची नोंद झाली. या दिवशी निर्देशांक सुमारे ६ टक्क्यांनी खाली आला. यामुळे गेल्या साडेसहा वर्षांमधील सर्वांत मोठ्या घसरणीची नोंद बाजाराने केली आहे. या घसरणीनंतर बाजार फारसा सावरलेला दिसून आलेला नाही.
मुंबई शेअर बाजारात बुधवारी विक्रम संवत २0७२चा प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने बाजारात मुहूर्तांच्या व्यवहाराचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी एक तास हे व्यवहार होणार आहेत.
गेली दोन वर्षे मुहूर्ताच्या व्यवहारांना बाजारात तेजी दिसून आली आहे. यंदाही मुहूर्ताला तेजी राहून बाजार हॅट्ट्रिक पूर्ण करणार का? याबाबत उत्सुकता आहे.
शेअर बाजाराला प्रतीक्षा ‘अच्छे दिन’ची
भाजपाचे सरकार अधिकारावर आल्यापासून काही काळ तेजीत राहिलेल्या शेअर बाजाराला बुधवारी संपणारे संवत्सर हे फारसे लाभदायक ठरलेले नाही.
By admin | Published: November 10, 2015 10:37 PM2015-11-10T22:37:44+5:302015-11-10T22:37:44+5:30