Adani Group Shares, LIC Investment: अदानी समूहाच्या समभागांच्या वाढीचा फायदा भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) देखील झाला आहे. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, एलआयसीची गुंतवणूक रक्कम 45,000 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. एलआयसीने एप्रिलपासून अदानी समूहातील गुंतवणुकीत 6,200 कोटी रुपयांची वाढ केली आहे. 24 जानेवारीला हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती आणि त्यामुळे एलआयसीच्या गुंतवणुकीच्या रकमेलाही मोठा फटका बसला होता. त्यानंतर या समभागांबाबत बरीच नकारात्मक चर्चा रंगली होती. पण या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.
तीन दिवसांत किती तेजी?
अदानी समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. समूहाच्या एकूण मार्केट कॅपमध्ये तीन दिवसांत 1,77,927.29 कोटी रुपयांची वाढ झाली. अशाप्रकारे समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांची मार्केट कॅप 10,79,497.65 कोटी रुपये झाले.
अदानी ग्रुपच्या स्टॉकचे काय?
समूहातील प्रमुख अदानी एंटरप्रायझेस 13 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह अव्वल ठरला. अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 13.19 टक्क्यांनी वाढले तर अदानी विल्मरचे शेअर्स बीएसईवर 9.99 टक्क्यांनी वधारले. अदानी पॉवर ५ टक्के, अदानी ट्रान्समिशन ५ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी ५ टक्के, अदानी टोटल गॅस ५ टक्के आणि एनडीटीव्ही ४.९९ टक्क्यांनी वाढले. यासह अंबुजा सिमेंटचे शेअर्सही ०.९० टक्के, अदानी पोर्ट्सचे शेअर्स ०.५३ टक्के आणि एसीसीचे शेअर्स ०.२५ टक्क्यांनी वाढले. व्यवहारादरम्यान काही समूह कंपन्यांचे समभागही वरच्या टप्प्यात आले.