मुंबई - काही वर्षांच्या निराशाजनक वातावरणानंतर IT क्षेत्रामध्ये 2017मध्ये कर्मचारी भरतीच्या बाबतीत उत्साह दिसून आला आहे. बहुतेक महाविद्यालयांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये आयटी कंपन्यांनी रिक्रूटमेंटच्या बाबतीत बाजी मारल्याचे चित्र आहे. प्रत्येक कंपनीनं आपली आवडती कॉलेजेस निवडली आणि मोठ्या संख्येने होतकरू पदवीधरांना निवडलं आहे. त्यामुळे आयटी साठी बिग बँग पुन्हा अवतरतंय का अशी चर्चा आहे.टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार इंटेलनं कानपूर आयआयटीमधून तब्बल 59 जणांना नोकरीसाठी निवडलं आहे. हार्डवेअर व सॉफ्टवेअर अशा दोन्ही विभागांसाठी कॉम्प्युटर सायन्स व इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना निवडण्यात आलं आहे.
आयटी क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे, आणि ज्यावेळी मनासारखे उमेदवार मिळत आहेत त्यावेळी कंपन्या तात्काळ त्यांना निवडत असल्याचं मत एका तज्ज्ञानं व्यक्त केलं आहे. अनेक कंपन्यांनी तर सुरुवातीला कमी उमेदवार घेण्याचे ठरवले होते, परंतु कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू झाल्यानंतर त्यांनी बेत बदलला आणि जास्त उमेदवारांना ऑफर्स दिल्या. पाच ते सहा जणांना नोकरी देण्यात येईल अशी अपेक्षा असताना काही कंपन्यांनी 25 ते 30 जणांना नोकऱ्या देऊ केल्या आहेत.
आयआयटी मुंबईमधल्या 30 इंजिनीअर्सना सॅमसंग कंपनीने कॅम्पस प्लेसमेंटच्यावेळी निवडले तर अन्य 15 जणांना प्री-प्लेसमेंट निवडण्यात आले आहे. गेल्या वर्षी सॅमसंगने 22 जणांना कामावर घेतले होते.
गेल्या वर्षीपेक्षा उमेदवारांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवडण्यात तब्बल 25 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसत आहे. सरकारने कोअर इंजिनीअरिंग क्षेत्राला दिलेल्या प्रोत्साहनाचा व एकूण धोरणांचा परिणाम उमेदवार भरतीमध्ये दिसत असल्याचे मत आयआयटी गुवाहाटीचे प्लेसमेंट डीन कौस्तुभ मोहंती यांनी व्यक्त केले आहे.