नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रवासी वाहतूक जवळपास बंदच असल्यामुळे भारतीय रेल्वेचे मोठे नुकसान झाले असले तरी, पडून असलेल्या भंगाराने रेल्वेला ‘अच्छे दिन’ पाहायला मिळाले आहेत. भंगार विकून रेल्वेने वर्षभरात तब्बल ४,५७५ कोटी कमावले आहेत. दरम्यान, रेल्वेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून ४,१०० कोटी रुपये इतके उत्पन्न मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
एका माहिती अधिकार अर्जावर रेल्वेच्यावतीने ही माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे. त्यानुसार, २०२०-२१ या वित्त वर्षात भारतीय रेल्वेने भंगार विक्रीतून तब्बल ४,५७५ कोटी रुपये कमावले आहेत. भंगार विक्रीतून झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कमाई आहे. यापूर्वी २०१०-११ साली रेल्वेने भंगार विकून ४,४०९ कोटी रुपये मिळविले होते. रेल्वेकडून भंगारात काढण्यात आलेल्या वस्तूंमध्ये जुने रुळ, साचे, जुनी इंजिने, डबे इत्यादींचा समावेश आहे. सध्या अनेक मार्गांवर रेल्वेकडून विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे जुन्या इंजिनांमध्ये बदल करावे लागतात.
या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भंगार निघते. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंगार विक्रीचा व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यात आली. रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, २०२०-२१ या आर्थिक वर्षात रेल्वे बोर्डाने ४,००० कोटी रुपयांचे भंगार विक्रीचे उद्दिष्ट निर्धारित केले होते. मात्र, रेल्वेने हे उद्दिष्ट ओलांडून ४,५७५ कोटी रुपये उभे केले. भंगार विक्रीतून भारतीय रेल्वेने केलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक कमाई ठरली आहे. ही रक्कम निर्धारित लक्ष्यापेक्षा सुमारे १४ टक्के अधिक आहे आणि गेल्या आर्थिक वर्षातील भंगार विक्रीच्या आकड्यांपेक्षा पाच टक्क्यांनी जास्त आहे.
गतवर्षापेक्षा पाच टक्के अधिक उत्पन्न -
माहिती अधिकार कायद्यांतर्गत मध्य प्रदेशमधील चंद्रशेखर गौर यांनी मागितलेल्या माहितीला उत्तर देताना रेल्वे बोर्डाने म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या साथीने २०२०-२१ मध्ये त्रस्त झालेल्या रेल्वेने आदल्या वर्षाच्या तुलनेत भंगारातून पाच टक्के अधिक उत्पन्न मिळवले आहे. २०१९-२० मध्ये ४,३३३ कोटी रुपयांच्या भंगार वस्तूंची विक्री केली होती. २०२०-२१ मध्ये भंगारातून तब्बल ४,५७५ कोटी रुपये मिळाले. तसेच २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी भंगार विक्रीतून रेल्वे बोर्डाने ४,१०० कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.