प्रसाद गो. जोशी
कोरोना विषाणूचा कमी होत असलेला संसर्ग, त्यामुळे जगभरामध्ये काही प्रमाणात सुरू झालेली आर्थिक उलाढाल याचा सकारात्मक परिणाम जगभरातील शेअर बाजारांमध्ये झाला. त्यामुळे भारतातील बाजारही तेजीमध्ये राहिले. एप्रिल महिन्याच्या फ्यूचर अॅण्ड आॅप्शन्स व्यवहारांची सांगता ही निफ्टीमध्ये १४ टक्के वाढीने झाली.
त्यामध्ये संवेदनशील निर्देशांक वाढीव पातळीवर सुरू झाला. त्यानंतर तो ३१, ६५१ अंशांपर्यंत खाली जाऊन मग त्याने ३३,८८७ अंशांची सप्ताहातील सर्वाधिक पातळी गाठली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक निफ्टीनेही सप्ताहामध्ये चांगली कामगिरी केली. ७.७ टक्क्यांनी वाढलेला निफ्टी हा १० हजार अंशांच्या पातळीजवळ पोहोचला असून, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होऊ लागला आहे.
क्षेत्रीय निर्देशांकानीही सरासरीने चांगली कामगिरी केली आहे. निफ्टी मेटल हा निर्देशांक सर्वाधिक म्हणजे १३ टक्क्यांनी वाढला. त्यापाठोपाठ निफ्टी आयटी आणि निफ्टी बॅँक हे क्षेत्रीय निर्देशांक वाढले. मात्र निफ्टी फार्मा या निर्देशांकामध्ये दोन टक्क्यांनी घट झाली आहे.गेले काही सप्ताह सातत्याने विक्री करीत असलेल्या वित्तसंस्थाही बाजारामध्ये अधिक सक्रिय झाल्या आहेत. गत सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी बाजारामध्ये १६५२.३१ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. त्याचबरोबर देशांतर्गत वित्तीय संस्थांनीही २८९३.४ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे. त्यामुळे बाजारामध्ये काही प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे.