नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील ८ कोटी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज मिळाली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (सीबीटी) भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) व्याजदरात ०.१० टक्के वाढ करण्याची शिफारस अर्थमंत्रालयाला केली आहे. त्यामुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षांत ‘पीएफ’वर ८.२५ टक्के व्याज मिळणार आहे.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ‘सीबीटी’च्या २३५ व्या बैठकीत २०२३-२४ साठी व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची शिफारस आता वित्त मंत्रालयाकडे जाईल. मंजुरीनंतर नव्या दरानुसार व्याज सदस्यांच्या खात्यात जमा केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे मागील तीन वर्षांतील हा उच्चांकी व्याजदर आहे. यापूर्वी २०१९-२० मध्ये ८.५ टक्के व्याज दिले गेले होते. २०२०-२१ मध्ये हा व्याजदर कायम ठेवण्यात आला होता.
खात्यांत येणार १ लाख ७ हजार कोटी
आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी, सीबीटीने एकूण १३ लाख कोटी रुपयांच्या मूळ रकमेवर ८ कोटी ईपीएफ सदस्यांच्या खात्यात १,०७,००० कोटी रुपयांचे व्याज वितरित करण्याची शिफारस केली.